350 वाहनांवर दंडात्मक कारवाई ; नियमांचे पालन करण्याचे आवाहन
भुसावळ- भुसावळसह विभागातील रावेर आणि यावल शहरात वाहतूक नियम मोडणार्या वाहनधारकांविरुद्ध धडक कारवाई मोहिम राबवली जात असल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी एकाच दिवशी तीनही शहरात 350 पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला.
तीनही शहरात धडक कारवाईने खळबळ
रावेरात पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुल्ला पेट्रोल पंपासमोर सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पाळदे, फौजदार मनोहर जाधव, सहाय्यक फौजदार शरीफ तडवी, शेख इस्माईल, हरी पाटील, खंडेराव, दिवाकर जोशी, तुषार मोरे, सुरेश मेढे, विलास तायडे, सुनील सोनवणे, महिला पोलीस नयना वडनेरे आदींनी कारवाई केली. नाकाबंदी करून वाहतूक नियमांचा भंग करणार्या 104 वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 10 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आला. भुसावळात डीवायएसपी गजानन राठोड यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली अष्टभुजा देवी मंदिर, बसस्थानक, गांधी पुतळा, बाजारपेठ पोलिस ठाणे, नाहाटा चौफुली, तालुका पोलिस ठाण्यासमोर दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेपर्यत नाकाबंदी होती. त्यात 180 वाहनांवर कारवाई करीत 36 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेने 56, बाजारपेठ 57, शहर 30, तर तालुका पोलिसांनी 27 वाहनांवर कारवाई केली. यावलमध्ये भुसावळ टी पॉइंट, चोपडा नाका, फैजपूर रस्ता येथे निरीक्षक डी.के.परदेशी, एपीआय सुमीत ठाकरे, सहायक फौजदार सिकंदर तडवी, शेख सलीम, प्रदीप खेळकर, राहुल चौधरी, सतीश भोई यांच्या पथकाने कारवाई केली. त्यात 72 वाहने तपासण्यात आली.