वाहतूक पोलिसांकडून जनजागृती

0

पिंपरी – शहरात वाढलेल्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे सर्व नियम वाहनचालकांनी पाळले पाहिजेत यासाठी वाहतूक पोलिसांकडून शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहनांवर स्टिकर्स चिकटवून वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या जगजागृती अभियानाअंतर्गत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पोलिस निरीक्षक आर. एस. निंबाळकर आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एच. भागवत यांनी दुचाकी व चारचाकी वाहनांवर जनजागृती अभियानाचे स्टिकर्स लावले. यावेळी पोलिस नाईक आर. पी. हांडे, एस. आर. साळुंके, पोलिस शिपाई पी. एच. चोरमले आदी उपस्थित होते. वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे, सिग्नलचे पालन करावे. वाहन चालवित असताना मोबाईलचा वापर करु नये. दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेटचा व चारचाकी वाहन चालकांनी सिटबेल्टचा वापर करावा. चौकात सिग्नलला वाहन उभे करताना झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यावर थांबू नये. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरीक, अंध, अपंग व्यक्तींना तसेच पादचार्‍यांना प्रथम रस्ता ओलांडण्यास प्राध्यान्य द्यावे. वाहन चालकाचा परवाना, वाहनाची सर्व कागदपत्रे, वाहन प्रदुषण चाचणी प्रमाणपत्र नेहमी बरोबर ठेवावेत. शाळा, दवाखाना आणि रुग्णालयांजवळ हॉर्न वाजवू नये अशा विविध नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिस करत आहेत.