वाहतूक पोलिसांच्या जाचामुळे वाहन चालक त्रस्त

0

एरंडोल। येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या दोन वाहतुक पोलिसांच्या जाचामुळे सर्वसामान्य वाहनचालक त्रस्त झाले आहेत. कागदपत्रांची तपासणी करण्याच्या नावाखाली वाहने थांबवून चालकांकडून दररोज हजारो रुपये उकळण्याचा गोरख धंदा या दोन पोलिसांनी सुरु केला असून याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देऊन वाहन चालकांची होणारी पिळवणूक थांबवावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. एरंडोल पोलीस स्थानकात कार्यरत असलेले दोन वाहतुक पोलीस कर्मचारी म्हसावद रस्ता, धरणगाव रस्ता, राष्ट्रीय महामार्गावरील ठराविक ठिकाणी उभे राहून वाहने थांबवुन चालकांकडे कागद पत्रांची पाहणी करायची आहे असे सांगुन चालकांना धमकावून त्यांचेकडून योग्य ती रक्कम घेऊन त्रास देत आहेत. अनेक वेळा वाहन चालकाकडे सर्व प्रकारचे कागद पत्रे असतांना देखील विविध कारणे सांगून प्रसंगी चालकांना शिवराळ भाषेत बोलुन अपमानस्पद वागणुक देखील देण्याचा प्रयत्न केला जातो.

होणारा त्रास थांबविण्याची मागणी
सदरच्या पोलीस कर्मचार्‍यांना कोणाचा वरदहस्त आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांकडून रस्त्यावरच वाहने थांबविली जात असल्यामुळे अनेक वेळा वाहतुकीचा खोळंबा होत असतो. परराज्यातील व विदर्भ, मराठवाडा या भागातील वाहन चालकांना सर्वात जास्त त्रास दिला जात आहे. धरणगाव चौफुली जवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर देखील अवजड वाहने थांबवुन वाहतुकीस अडथळा निर्माण केला जातो. बस स्थानक परिसरात भुरट्या चोर्‍या होत असतांना सदरचे कर्मचारी बस स्थानकावर न थांबता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अन्यत्र फिरत असतात. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्वरित लक्ष घालुन वाहतुक पोलिसांकडून वाहन चालकांना होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी चालकांनी केली आहे.