वाहतूक पोलिसांच्या धर्तीवर मनपाने कारवाई करावी अशी मागणी

0

नवी मुंबई । मनपाचे अतिक्रमण विभाग नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यानंतर जॅमर लावून वाहनास अटकाव करतात. परंतु, याच दंडाबाबत कोणताही निर्णय घेतला गेला नसल्याने अतिक्रमण विभाग आपल्या मनाप्रमाणे दंड आकारत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, टोइंग व्हॅनद्वारे वाहने उचलल्यानंतर जे दंड आकारले जाते तो दंडही जास्तच असल्याने वाहनचालकमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. वाहतूक पोलीस अशाच प्रकारे कारवाई करत असतात. परंतु, त्यांचा दंड हा 300 रुपायांच्या आसपास आसल्यामुळे वाहन चालक चूक केली म्हणून दंड भरतातही, परंतु मनपाच्या या हुकूमशाहीला वाहन चालक मात्र कंटाळले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या धर्तीवर मनपाने कारवाई करावी, अशी मागणी अक्षय धनावडे यांनी केली आहे. मनपाच्या हद्दी मध्ये रस्त्या लगत, नो पार्किंग झोन तसेच नियमबाह्य ठिकाणी वाहने उभी असतील तर वाहनावर कारवाई करण्यात येते. तसेच टोइंग व्हॅनच्या साहाय्याने वाहने उचलली जातात.

किती दंड आकारायचा याबाबत कोणताही निर्णय नाही
तर काही वेळा टोइंग व्हॅन नसेल तर जॅमर लावून वाहनास अटकाव केले जाते. वाहनाला अटकाव केल्या नंतर संबंधित मालक जॅमर काढावा म्हणून मनपा कार्यालयात फेर्‍या मारत असतात. परंतु, संबंधित अधिकारी आपल्याला हवे तसे दंड आकारत असल्याने वाहनचालक व मालकामध्ये मनपाच्या या कार्यपद्धतीवर कमालीचे संताप व्यक्त करत आहेत. मनपाच्या टोइंग व्हॅनद्वारे वाहन उचलल्यानंतर त्याचा दंड मनपाने 6100 रुपये निश्‍चित केला आहे. परंतु हा दंडही भयानक असल्यामुळे चालकांच्या मनात कमालीचा रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे एकवेळ वाहतूक पोलिसांनी कारवाई बरी, पण मनपाची कारवाई नको अशी म्हणण्याची पाळी वाहन मालकावर आली आहे. याबाबत आयुक्तांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी समाज सेवक शाम मेहता यांनी केली आहे. वाहन उचलल्यानंतर दंडाची रक्कम जास्त असल्यामुळे याचा फायदा आतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा रक्षक लक्ष्मी दर्शन घेऊन चांगलेच घेत असल्याचे वास्तव आहे. जॅमर लावल्यावर किंवा वाहन उचळल्यावर अमानुषपणे दंड देण्यापेक्षा 1000 ते 2000 रुपयांची मांडवली केली की वाहन सोडले जात असल्याने वाहनमालक अनधिकृतपणे पैसे देण्यास राजी होत असल्याने या दंडाबाबत आयुक्तांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशीही मागणी होत आहे. अनधिकृतपणे लक्ष्मीदर्शन दिले जात असल्याने मनपाचे लाखो रुपयांचे महसूल मात्र बुडत आहे. याबाबत अतिक्रमण विभागाचे प्रशासन अधिकारी उत्तम खरात यांना विचारले असता, जॅमर लावल्यावर किती दंड आकारायचा याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.