सांगवी : वाहतुकीचे नियम नागरिकांनी पाळावेत, यासाठी वाहतूक पोलीस काही ना काही शक्कल लढवत असतात. त्याचाच एक भाग म्हणून, सोमवारी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात सिग्नलवर थांबलेल्या नागरिकांना वाहतूक पोलीस रक्षाबंधनाचे शुभेच्छा पत्र देत होते. तर, सांगवी वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना चक्क राख्या बांधल्या. यावेळी वाहतूक पोलिसांनी ओवाळणीमध्ये वाहतूक नियमांचे पालन करणार, अशी हमी नागरिकांकडून घेतली. जगताप डेअरी, शिवार चौक येथे सांगवी पोलिसांतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, पोलीस कर्मचार्यांनी स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करून राख्या व शुभेच्छापत्र बनवले होते. ही कल्पना पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मांडली तर वाहतूक पोलिसांनी ती अंमलात आणली.
यांची होती उपस्थिती
या उपक्रमावेळी वाहतूक विभाग पुणे शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (परिमंडळ तीन) राजेंद्र भांबरे, सांगवी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे, पोलीस मित्र विनीता दाते, घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निकम, रक्षक शाळा व घोलप महाविद्यालय येथील विद्यार्थी व शिक्षक यांनीही आवर्जून हजेरी लावली होती.
दहा हजार राख्या व शुभेच्छा पत्र
पोलिसांकडून पाच हजार राख्या व पाच हजार शुभेच्छा पत्र सिग्नलवरील वाहनचालकांना देण्यात आले. वाहनचालकांसाठी हे सारे नवीनच होते. कारण नेहमी वाहतुकीचा नियम मोडला म्हणून, दंड ठोकणारे वाहतूक पोलीस चक्क वाहनचालकांना राख्या बांधत होते. दादा-ताई वाहतुकीचे नियम पाळा, अशी विनंती करत होते. त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांनीही कौतुक केले. वाहन चालविताना सिटबेल्ट लावा, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करू नका, सिग्नल तोडू नका व स्टॉप लाईनच्या अगोदर थांबा, ट्रिपल सीट बसून वाहन चालवू नका, अॅम्बुलन्सला प्रथम प्राधान्य द्या, वाहने रस्त्याच्या चुकीच्या बाजूने चालवू नका, अवजड वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवा, दंडाची रक्कम रोख न भरता ती कार्डद्वारे भरा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले.