वाहतूक प्रश्‍न सोडविण्यासाठी आमदार गोरे यांनी पोलीस व रस्ते कंपनी अधिकार्‍यांसह पाहणी

0
पुणे-नाशिक महामार्गावरील रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविणार
रस्त्यांवरील समस्यांबाबत आमदारांनी केल्या सूचना
चाकण :पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण येथे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न अत्यंत जटिल होत चालला आहे. बनला आहे. हा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने आमदार सुरेश गोरे यांनी पोलीस अधिकारी, रस्ते कंपनीचे अधिकारी यांच्यासह पाहणी केली. गोरे यांनी रस्ते कंपनीचे अधिकारी, नाणेकरवाडीचे सरपंच व इतरांना सूचना केल्या. महामार्ग आणि सेवा रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या महामार्गावरील अवैध प्रवासी वाहतुकीच्या काही रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे ही वाहने बंद आहेत. सेवा रस्त्यावर पाणी साचत असून, खड्डेही पडले आहेत. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे. या रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे. रस्ते कंपनीने याकडे लक्ष द्यावे, तसेच नाणेकरवाडी ग्रामपंचायतीनेही उपाययोजना कराव्यात, यांसह आणखी काही सूचना गोरे यांनी या वेळी दिल्या. आयआरबी रस्ते कंपनीचे अभियंता सतीश इनामदार यांना रस्त्याची कामे करण्याबाबत सांगितले.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण मांजरे, पंचायत समितीचे उपसभापती भगवान पोखरकर, शिवसेनेचे खेड तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, नगराध्यक्ष शेखर घोगरे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, नगरसेवक प्रवीण गोरे, धीरज मुटके, लक्ष्मण जाधव, विजय शिंदे, राहुल गोरे, दत्ता गवते, नाणेकरवाडीचे सरपंच सिद्धेश नाणेकर आदी व इतर उपस्थित होते. नाणेकरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गावरील, सेवा रस्त्यावरील कचरा ग्रामपंचायतीने उचलावा, सेवा रस्त्यावर वाहणार्‍या सांडपाण्याची व्यवस्था करावी, असे गोरे यांनी सरपंच नाणेकर यांना सांगितले. याशिवाय त्यांनी चाकणच्या वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, रवींद्र चौधर यांच्याशी वाहतूक नियंत्रणाबाबत चर्चा केली.
कायदा हातात घेणार्‍यांवर कारवाई
पिंपरी-चिंचवडच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी यांनी सांगितले की, चाकण येथील वाहतूक कोंडीबाबत काहीजण हातात दांडके घेऊन वाहनांच्या काचा फोडत असतील आणि त्यामुळे महामार्गावरून जाणार्‍यांमध्ये दहशत व घबराट निर्माण होत असेल; तर तसे करणे चुकीचे आहे. कायदा हातात घेणार्‍यांवर कारवाई करणार आहे. लोकप्रतिनिधींनीही शांततेत, कायद्याच्या चौकटीत राहून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पोलिसांचे व अधिकार्‍यांचे निश्‍चित सहकार्य राहील. चाकणची बदनामी होण्यासारखे काही करू नका.
भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजन परदेशी यांनी सांगितले की, चाकण औद्योगिक वसाहतीत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. या भागातील रोजगारनिर्मितीसाठी चाकणचा औद्योगिक विस्तार तसेच विकास होणे महत्त्वाचे आहे. चाकणला नाशिक महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे उद्योजक, कामगार, प्रवासी त्रस्त झाले आहेत. नाशिक महामार्गाचे रखडलेले काम लवकर मार्गी लागावे यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना उद्योजकांच्या शिष्टमंडळासह भेटणार आहे अशी माहिती दिली.