मेट्रोने अभ्यास करून निष्कर्ष काढावा : वाहतूक विभागाचे आदेश
पुणे : नळस्टॉप परिसरात उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वीच्या वाहतूक बदल चाचणीवर अद्याप तोडगा निघू शकला नाही. याबाबत शनिवारी झालेल्या बैठकीत मेट्रोकडून काही बदल सूचविण्यात आले. मेट्रोने संबंधीत बदलाचा अभ्यास करून निष्कर्ष काढावा. यानंतरच बदलाचा ट्रायलसाठी विचार होईल, असे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नळस्टॉप येथे प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यासाठी एसएनडीटी ते नळस्टॉप दरम्यान वाहतुकीत बदल करावा लागणार आहे. त्यासाठी मेट्रो प्रशासनाने वाहतूक पोलिसांना वाहतूक बदलाचे दोन पर्याय दिले होते. पहिल्या पर्यायाची काही दिवसांपूर्वी चाचणी घेण्यात आली. ये-जा करणार्या वाहनांची संख्या मोठी असल्याने ही चाचणी फसल्याने त्याला स्थगिती दिली. तर चक्राकार वाहतुकीमुळे देखील आवश्यक तो फायदा होणार नसल्याने वाहतूक पोलिसांकडून मेट्रोला नव्याने अभ्यास करण्यास सांगण्यात आले.
मेट्रो, वाहतूक पोलिसांची बैठक
शनिवारी मेट्रो, वाहतूक पोलीस, स्थानिक प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली. बैठकीत रस्त्यावरील सिग्नल अलीकडे घेणे, तसेच पूर्वीप्रमाणे काही वाहतूक सरळ तर याचवेळी काही वाहतूक चक्राकार करावी, अशी चर्चा झाली. याला काहींनी विरोधही केला. मात्र, नव्याने सूचविण्यात आलेल्या बदलाचा मेट्रोने स्वतः अभ्यास करून निष्कर्ष काढावा. यानंतर वाहतूक बदलाचा विचार करण्यात येईल, असे सांगत अद्याप यावर काही ठोस निर्णय झाला नसल्याचे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
नंतरच वाहतूक बदलाचा विचार
रस्त्यावरील सिग्नल सरकवणे, तसेच सरळ आणि चक्राकार वाहतुकीबाबत चर्चा झाली. मात्र, ठोस निर्णय झालेला नसून मेट्रोने सूचविलेल्या बदलांवर अभ्यास करून निष्कर्ष काढण्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर वाहतूक बदलाचा विचार करण्यात येईल. तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त, वाहतूक