वाहनचोरी, घरफोडीतील सराईत गुन्हेगारांना अटक

0

पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवड : शहरपरिसरात चारचाकी वाहन चोरी आणि घरफोडीच्या आरोपातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारासह त्यांच्याकडील चोरीचा तब्बल 15 लाख 11 हजार 958 रुपयांचा मुद्देमाल पुणे शहर गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने हस्तगत केला आहे. रफिक जमादार (वय 29, रा.विद्यानगर), करण जाधव (वय 22, रा.आळंदी) आणि निलेश पवार (वय 23 रा.भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत चोरांची नावे आहेत. पोलीसांनी त्यांच्याकडून पुणे शहर हद्दीतील चारचाकी वाहनचोरीचे 3, घरफोडी चोरीचा 1, तसेच पुणे ग्रामीण हद्दीतील घरफोडी चोरीचे 2 असे एकूण 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

मोटारींसह, महागडे धातूचे साहित्य जप्त
यामध्ये आरोपींकडून पोलीसांनी निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन महागड्या कार व महागडे कॉपर, ब्रास आणि अ‍ॅल्यमिनीयचे रॉड, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपींनी एक कार व घरफोडी तील साहित्य, तसेच लोणी काळभोर येथील एक कंपनीतून स्टिलचे इंडस्ट्रीयल जॉब आणि चाकण येथील वेगवेगळ्या कंपनीच्या वाहनांच्या नविन व जुन्या बॅटर्‍या जप्त केल्या आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुकर संजय निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे तसेच वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक नागेश भोसले, पोलीस हवालदार अब्दुलकरीम सय्यद, तुकाराम नाले, गणेश साळुंखे, संभाजी गायकवाड, हनुमंत बोराटे, राजेंद्र वांबुरे, जितेंद्र तुपे, पोलीस नाईक सुहास कदम, सागर घोरपडे, विशाल शिर्के यांच्या पथकाने केली आहे. पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे पुढील तपास करत आहेत.