वाहनचोरी व घरफोडी करणार्‍या दोन टोळ्या जेरबंद

0

पिंपरी-चिंचवड। शहरात घरफोडी व वाहनचोरी करणार्‍या दोन टोळ्यांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये पोलिसांनी सात लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मोटारसायकल चोरीमध्ये मोहंमद रजा सेहमसुल्ला चौधरी (वय 21 रा. कुदळवाडी, चिखली) नौशाद अकबरअली शेख (वय 19 रा. मोशीरोड, चिखली) तर घरफोडी प्रकरणी सुरेश गोरख जाधव (वय 27) अविनाश उर्फ राहुल रोहीदास मोहिते (वय 27) दोघेही राहणार रामनगर चिंचवड, सागर राम भडकवाड (वय 23 रा. दत्तनगर, चिंचवड), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

दुचाकी, सोने, रक्कम, टीव्ही जप्त
तर दुस-या गुन्ह्यामध्ये 31 जुलै रोजी गस्त घालत असताना दोन संशयीत परिसरात मोटरसायकलवरुन फिरताना पोलिसांना दिसले. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता. त्यांनी घरफोडी केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून 2 दुचाकी, 60 ग्रॅम सोने, 44 हजार रोख रक्कम व 7 एलसीडी टीव्ही ताब्यात घेतले. त्यांनी केलेले चिंचवड पोलीस ठाण्यातील चार, पिंपरी दोन, निगडी एक, चाकण दोन व भोसरी एक, असे घरफोडीचे 10 तर वाहनचोरीचे दोन, असे 12 गुन्हे उघड झाले. या दोन्ही टोळ्यांकडून पोलिसांनी 11 मोटारसायकली, 60 ग्राम सोने, सात एलसी डी टीव्ही, एक मोबाइल, असा एकूण सात लाख 42 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस पथकात यांचा होता समावेश
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे व गुन्हे पोलीस निरीक्षक विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत महाले, पोलीस हवालदार विलास होनमाने, अशोक आटोळे, पोलीस नाईक स्वप्निल शेलार, सुधाकर अवताडे, चंद्रकांत गडदे, ऋषिकेश पाटील, पोलीस शिपाई मुकेश माळी, शेखर बाविस्कर, राहुल मिसाळ, सचिन वर्णेकर, अमोल माने, गोविंद डोके, पंकज भदाणे, विजयकुमार आखाडे, महिला पोलीस नाईक रुपाली पुरीगोसावी, कांचन घवले यांनी केली.

पाठलाग करून पकडले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या गुन्ह्यात गस्त घालणार्‍या पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या वाहनांची माहिती विचारला असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी गाडीक्रमांक मोबाईल वाहन या अ‍ॅपवर टाकला असता. गाडी भोसरी भागातून चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांना सापडली. त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले व सखोल चौकशी केली असता 9 मोटार सायकल चोरल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून 3 लाख 40 हजार रुपये किमतीच्या गाड्या जप्त केल्या. तसेच त्यांच्यावरील एमआयडीसी भोसरी, पिंपरी-चिंचवड, असे एकूण 6 गुन्हे उघडकीस आले.