शिरूर । शिरूर शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होताना दिसून येत आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्यातच गाड्या पार्क केल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोडींची समस्या जटील बनली आहे. बेशिस्त वाहतूक आणि दिखाऊ वाहतूक पोलिस यंत्रणा यामुळे छोट्या मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. पादचार्यांना तर चालणेच कठीण होऊन बसले आहे. चालताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक व वाहन चालक हैराण झाले आहेत. परिणामी शहरात वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. प्रशासन मात्र याकडे डोळे झाक करत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरीक देत आहेत.
अपघाताची शक्यता
शहराची बाजार पेठ मोठी असल्याने तालुक्यासह शेजारील तालुक्यातील नागरीक व विद्यार्थी रोज शिरुरमध्ये येतात. परंतु शहरात दोन चाकीसह चारचाकी वाहनांसाठी कोठेही पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरीक आपली वाहने बिनधास्तपणे रस्त्यावरच कशीही लावत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. विद्याधाम प्रशाला, प्राथमिक शाळा व आरएमडी इंग्लिश मीडियम स्कूल या परीसरात शाळा भरताना व सुटताना हजारो विद्यार्थ्यांना पुणे व नगर रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्याधाम प्रशाला ते बस स्थानक परीसरात कायम स्वरुपी वाहतूक पोलिस नेमण्याची मागणी नागरीकांमधून जोर धरत आहे.
दिवसेंदिवस वाढतेय वाहतूक कोंडी
वाहने सर्रासपणे रस्त्यावरच लावली जातात. यामुळे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरातील सर्वच अंतर्गत रस्त्यांचीदेखील अशीच अवस्था झालेली आहे. पाचकंदील चौक ते डंबेनाला येथून जाणार्या अंतर्गत रस्त्यावर, सरदार पेठ ते सोनार आळी परीसरातील अरुंद रस्त्यावर वाहने कशीही वेडीवाकडी रस्त्यातच उभी केली जातात. याचा मोठा फटका शहरवासियांना बसतो. बसस्थानक परिसरातही वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील होत चालला असून शिरूर पोलिसांनी व नगरपरीषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.
चालकांना करावी लागते कसरत
शिरुरमधील ग्रामीण व खाजगी रुग्णालये, शाळा, महाविद्यालय, बसस्थानक विविध शासकीय कार्यालये, बँका आदी ठिकाणी जाण्या-येण्यासाठी नागरीकांना पुणे-नगर मुख्य रस्त्यावरूनच जावे लागते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. हुतात्मा स्मारक ते बस स्थानक रस्त्यावर नेहमीच वाहनांची व पादचार्यांची मोठी गर्दी असते. रस्त्यावर दुचाकीसह चारचाकी वाहने बेशिस्तपणे कशीही पार्क केलेली असल्याने येथून मार्गक्रमण करताना चालकांना कसरत करावी लागते.
रस्त्यांवर पार्किंगचे पट्टे मारलेले असून राहिलेल्या रस्त्यांवर पार्किंग पट्टे मारण्याचे व पार्किंग संदर्भातचे फलक लावण्याबाबतची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. तसेच पोलिस प्रशासन व नगरपरीषद प्रशासनाची बैठक घेऊन वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करणार आहे.
– विद्यादेवी पोळ, मुख्याधिकारी, शिरूर नगरपरीषद
तालुक्याचा विस्तार मोठा आहे. त्याप्रमाणात पोलिस ठाण्याला मनुष्य बळ कमी पडत आहे. शेजारील तालुक्यातून शहरात येणार्या विद्यार्थी व नागरीकांची संख्या मोठी आहे. परंतु त्याप्रमाणात शहरात पार्किंगची व्यवस्था नसून त्यासाठी काही जागा निवडल्या आहेत. त्याबाबत संबंधीत विभागास पत्र व्यवहार करून पार्किंगची समस्या व वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– राजेंद्र कुंटे, पोलिस निरीक्षक, शिरूर
कोंडीला नगरपरिषदच जबाबदार
शिरूर शहरातून जाणारा पुणे-नगर रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. शहरातील वाहतूक कोंडीला पुर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषद जबाबदार आहे. नगरपरीषदेने पार्किंगची व्यवस्था करावी. शाळा, महाविद्यालयांत पालक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी अथवा सोडण्यासाठी येतात. अशा वेळी येथे पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे पालकांना आपली वाहने रस्त्यावरच लावावी लागत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या ठिकाणीही पार्किंगची व्यवस्था शाळा, महाविद्यालयांनी करून देणे आवश्यक आहे.
– संजय पाचंगे, अध्यक्ष, क्रांतीवीर प्रतिष्ठान
वाहतूक सुरळीत करा
सध्या शिरुरची अवस्था अतिशय गचाळ व अस्ताव्यस्थ झालेली असून यासाठी नगरपालिका व वाहतूक पोलिस सर्वस्वी जबाबदार आहेत. शिरूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने व येथे मोठी बाजार पेठ असल्याने दररोज हजारो नागरिक येथे येत असतात. नागरिकांना गाड्या पार्क करण्यासाठी येथे पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे ते कोठुही आणि कशाही गाड्या पार्क करतात. त्यामुळे नागरिकांसह वृद्धांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. पोलिसांनी वाहतूक कशी सुरळीत होईल याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. नगरपरिषदेने लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढावा.
– स्वप्नील माळवे, तालुकाध्यक्ष, मनविसे
बेशिस्त पार्किंगचा त्रास
शहरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली असून शिरुर पोलिस मात्र याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत. बेशिस्त पार्किंगमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे बर्याच वेळा अपघातदेखील होतात. या नित्याच्याच झालेल्या वाहतुक कोंडीचा वृध्द नागरीक, महिला व शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
– मितेश गादिया, जिल्हा चिटणीस,
भाजपा युवा मोर्चा