पुणे : वाहन खरेदी करताना नागरिकांकडून ‘आरटीओ’ तसेच हँडलिंग चार्जेसच्या नावाखाली जादा पैसे उकळणार्या वाहन वितरकांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. काही वाहन वितरक दुचाकी आणि चारचाकीसाठी पैसे उकळत असल्याचे समोर आले. राज्य शासनाने परिपत्रक काढले असून सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
नव्या वाहनांची खरेदी करताना वाहनाची मूळ किंमत, विविध कर आणि अधिभारांसह वाहनवितरक ‘आरटीओ चार्जेस’ किंवा हँडलिंग चार्जेस’ म्हणून जादा रक्कम वसूल करतात. हे अतिरिक्त शुल्क नियमबाह्य असल्याची माहिती नसते. वाहन नोंदणीसाठी आरटीओशी संबंधित प्रक्रिया करण्यासाठी संबंधित शुल्क भरावे लागत असल्याचे उत्तर दिले जात होते. ‘आरटीओ चार्जेस’च्या नावाखाली दुचाकीसाठी पाचशे ते दीड हजार रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी दोन ते तीन हजार रुपये जादा शुल्क घेतले जात असल्याचे समोर आले होते. आरटीओ’ने वाहन वितरकांना सूचनाही दिल्या होत्या. यानंतर आता राज्य शासनाने संबंधित प्रकरण गांभिर्याने घेतले आहे.