वाहनांच्या धुरामुळे विविध आजारांना आमंत्रण

0

चाळीसगाव (गणेश पवार) । पूर्वीच्या काळात प्रवास करण्यासाठी अथवा जवळपास फिरण्यासाठी टांगा, बैलगाडी त्यानंतर सायकल यांचा वापर होत असल्याने माणसाचे आरोग्य मात्र चांगले राहत असे मात्र विज्ञानाची प्रगती होऊन लांबचा प्रवास जवळ झाला. वाहनांची व दुचाकीची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊन चारचाकी वाहने व दुचाकी रस्त्यावर धावू लागल्या. त्यामुळे प्रवास जवळचा झाला असला तरी त्याचे दुष्परिणाम देखील लवकरच समोर आले आहेत. चाळीसगाव परिसरातील विविध विभागांमध्ये प्रमुख मार्गासह उपमार्गावर भरधाव वेगाने धावणार्‍या विविध वाहनांच्या धुराच्या प्रदुषणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत असून यामुळे फुफ्फुसांच्या तसेच श्‍वासनलिकेच्या अनेक प्रकाराच्या आजाराने अनेक जण त्रस्त झाले आहेत. शासन स्तरावरून यासाठी उपाययोजना केल्या असल्या तरी त्या फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

विषारी धुरांमुळे प्रदूषणात वाढ
चाळीसगाव शहराचा झपाट्याने विस्तार होत असून गेल्या वर्षात चाळीसगाव शहरात अनेक नवीन घरांची बांधकाम होऊन लोक संख्येत देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्यामुळे वाहनांमध्ये देखील वाढ झाली. महागाडी चारचाळी व दुचाकी वाहने जुन्या भावात विक्री होत असलरूाने अनेक जण कमी किंमतीत वाहने घेत असल्याने व नवी वाहने देखील बाजारात झपाट्याने वाढत असल्याने रस्त्यावर लोकांची संख्या की व वाहने जास्त दिसत आहेत. या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर विषारी धूर बाहेर पडत असल्याने या धुरामुळे प्रदुषण वाढून अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. त्यात गळा, खोकला व फुफ्फुस चे आजार देखील कमालीची वाढले आहे. या धुरामुळे श्‍वास घेतांना देखील त्रास जाणवत असल्याने काही जण चक्क तोंडाला मास्क लावून फिरतांना दिसत आहेत. दवाखान्यांमध्ये देखील अशा आजारांचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. याचा प्रभाव जादा प्रमाणात लहान वयोगटातील बालकावर जाणवत आहेत. विषारी धुरावर नियंत्रण आणण्यासाठी शासनस्तरावर अनेक उपाययोजना असल्यातरी त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होतांना दिसत नाही. त्यामुळे हा राक्षसरूपी धूर दिवसेंदिवस वाढत आहे व त्याचे दुष्परिणाम आपल्याला बघावयास मिळत आहेत.

वाहनाची धुर तपासणीकडे आरटीओचे दुर्लक्ष
दुचाकी वाहन अथवा चार चाकी वाहनांची वेळोवेळी धूर तपासणी करणे अर्निवाय असतांना प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हे मात्र होतांना दिसत नाही. खरे पाहता शहरात अथवा रस्त्यांवर संबंधित विभाग आरटीओ यांचेमार्फत वाहनांची धूर तपासणी झाली पाहिजे. मात्र वर्षातूद एखाद्या दिवशी सुरक्षा सप्ताहनिमित्त आरटीओ वाहतूक शाखेचे पोलिस, महामार्ग पोलिस हे ठरावीक वेळेत गाड्यांना थांबवून धुराची तपासणी करतात व वाहनचालकांना सुचना देवून त्यांची सुटका केली जाते. त्यानंतर वर्षवर या धूरतपासणीकडे कोणीही लक्ष देत नाही. म्हणून दिवसेंदिवस या विषारी धुरामुळे प्रदुषण वाढत आहे. ज्याप्रमाणे रस्त्यावर आरटीओ, वाहतूक पोलिस व महामार्ग पोलिस वाहने अडवून कायद्याचा बडगा दाखवत त्यांचेकडून दंडाची वसुली करतात. तशाच पद्धतीने जर वाहनाची धूर तपासणी करून वाहनधारकांना योग्य त्या सूचना व दंडात्मक कारवाई करून जनजागृती केल्यास या विषयारी धुरावर नक्कीच अंकुश बसेल व येणार्‍या काळात आजारांवर देखील निमंत्रण राहणार आहे. यासाठी पोलिस प्रशासनासह सामाजिक संस्था, सामाजिक संघटना यांना देखील वाहनाच्या या विषारी धुरामुळे काय नुकसान होते याची जनजागृती करावी तरच या विषारी धुरावर नियंत्रण ठेवता येईल. पोलिसांनी देखील ठरावी ठिकाणी धूर तपासणीचे यंत्र ठेवून वाहनाची धूर तपासणी करावी, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

वाहनांच्या विषारी धुरामुळे अ‍ॅलर्जी होऊन शिंका येणे, सतत सर्दी होणे, घसा दुखणे, फुफ्फुसाचा निमोनिया होणे, श्‍वासनलिकेला यामुळे सुज येऊन कायमची सर्दी व डोके दुखणे ही व्याधी लागते.
– डॉ.सजीव पाटील
नाक, कान, घसा तज्ञ, चाळीसगाव

धुराच्या प्रदुषणामुळे लहान मुलांना कफ होऊन फुफ्फुसाचे आजार वाढतात. त्याचप्रमाणे रूग्णामध्ये दम्याचे आजार देखील होतात.
– डॉ.बी.वी.बाविस्कर
वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय, चाळीसगाव