वाहनांवर केली ‘सरसकट’ कारवाई

0

बेवारस वाहने जप्तीचे आदेश; काही नवीन वाहनांचेही नुकसान झाल्याने नागरिकांची नाराजी

100 हून अधिक चारचाकी व दुचाकी जप्त

पुणे : पुणे महापालिका आणि पुणे वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या रस्त्यावर बेवारस असलेल्या तसेच वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या वाहनांवर कारवाई केली. ही कारवाई केलेली वाहने सध्या नदीपात्रात लावण्यात आली आहेत. हायकोर्टाच्या आदेशानुसार पुणे महापालिका आणि पुणे वाहतूक शाखेकडून संयुक्त कारवाई करून रस्त्यावरील बेवारस आणि वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने उचलण्यात आली.

रविवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. यात शहरातील विविध भागांतील 100 हुन अधिक चारचाकी आणि दुचाकींचा समावेश आहे. या कारवाई दरम्यान काही वाहनांचे नुकसान झाल्याने नागरिकांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच नुकसान झालेल्या वाहनांची भरपाई कोण देणार असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

रस्त्याच्या कडेला वाहने लावू नका

रस्त्याच्या कडेला दुचाकीसाठी पाच हजार रुपये, तीन आसनी रिक्षा, सहा आसनी रिक्षा यांना प्रत्येकी दहा हजार रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी पंधरा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहने लावू नयेत, असे आवाहन करतानाच पीएमपीकडून रस्त्यावर चुकीच्यापद्धतीने गाडी लावल्या गेल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

अवाच्या-सव्वा दंडाची मागणी

या कारवाईमध्ये रस्त्यावर लावण्यात आलेली नवीन वाहनेसुद्धा उचलण्यात आली आहेत. पालिकेने कुठलीही नोटीस न देता ही कारवाई केल्याने नागरिकांना सकाळी आपली वाहने न दिसल्याने अनेकांनी पोलीस स्टेशनमध्ये वाहन चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. जे नागरिक आपली वाहने सोडवायला आले त्यांच्याकडून अवाच्या सव्वा दंडाची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर कारवाई दरम्यान अनेक वाहनांचे नुकसान झाल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

वादावादीचे प्रसंगही घडले

स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत रस्त्याच्या कडेला बेवारस उभ्या असलेल्या, वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या वाहनांवर कारवाई करताना महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून वाहनांवर ‘सरसकट’ कारवाई करण्यात आली. बेवारस वाहनांबरोबरच चालू स्थितीतील आणि नियमित वापरात असलेली दुचाकी, चारचाकी वाहनेही जप्त करून ती नदीपात्रात ठेवण्यात आली. जप्त केलेली वाहने बेवारस नसल्याचा दावा करून वाहनमालकांनी महापालिका प्रशासनाकडे त्याबाबत तक्रारी केल्या. मात्र दंडाची रक्कम भरल्यानंतरच गाड्या ताब्यात दिल्या जातील, अशी भूमिका महापालिकेच्या अधिकार्‍यांनी घेतल्यामुळे वाहतूक पोलीस, महापालिका अधिकारी आणि नागरिक यांच्यात वादावादीचे प्रसंग उद्भवले.

उच्च न्यायालयाचे आदेश आणि स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर बेवारस आणि वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसांत 115 वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. विश्रामबागवाडा, खडक, कोथरूड, शिवाजीनगर, दत्तवाडी, वारजे या भागात ही कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री पोलिसांकडून वापरातील गाडया उचलण्यात आल्या असून त्यामध्ये गाडयांचे नुकसान झाल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत.