जळगावात अपघातांची मालिका कायम ; पाठलाग करून ट्रकचालकास पकडले
जळगाव– भरधाव ट्रालाने धडक दिल्याने सुप्रीम कंपनीचे लेखापाल प्रमोद सुरेश महाजन (39, रा.असोदा) हे जागीच ठार झाले. मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शिल्पा फर्निचर, कस्तुरी हॉटेलसमोर हा अपघात झाला. अपघातानंतर ट्राला चालक पसार होत असताना त्यास एमआयडीसी पोलिसांनी काही अंतरापर्यंत पाठलाग करून ताब्यात घेतले.
महाजन हे दुचाकी (एम.एच.19 सी.टी.2936) ने सुप्रीम कंपनीत जात असताना भरधाव ट्रालाच्या मागच्या चाकात आल्याने जागीच मयत झाले. तत्पूर्वी अपघाताचे वृत्त कळताच हवालदार संजय जाधव, संजय धनगर, शरद भालेराव यांनी धाव घेत जखमी अवस्थेतील महाजन यांना रुग्णालयात हलवले मात्र तो पर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, अपघातानंतर ट्राला चालक पसार होत असतानाच पोलीस निरीक्षक अनिरुद्ध आढाव, दीपक चौधरी, एएसआय प्रकाश पाटील यांनी पाठलाग करून ट्राला चालकास वाहनासह ताब्यात घेतले.