वाहने चोरणार्‍या दोघांना अटक

0

निगडी : दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये निगडी पोलिसांनी वाहन चोरी करणार्‍या दोन चोरट्यांना जेरबंद केले आहे. या चोरट्यांकडून एक रिक्षा व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दिनेश आत्माराम गंडले (वय 25, रा. मोरे बिल्डींग, आळंदी) व गणेश धर्मानाप्पा बिराजदार (वय 27, रा. ट्रान्सपोर्टनगर, निगडी. मूळ रा. निलंगा, लातूर), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

चिकन चौकात एकाला पकडले
पहिली कारवाई निगडीतील चिकन चौकात झाली. तेथे एक जण संशयितरीत्या घाईगडबडीत रिक्षा घेऊन जाताना दिसला. त्याला गस्त घालणार्‍या पोलिसांनी अडवले. त्याची चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक तपास केला असता रिक्षाचा क्रमांक, चॅसी व इंजिन क्रमांकदेखील बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. संबंधित आरोपीकडून 30 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. पुढील तपासात त्याच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यातही दुचाकी चोरीचा गुन्हा असल्याचे उघड झाले.

दुसरा ट्रान्सपोर्टनगरातून अटकेत
दुसर्‍या कारवाईत, पोलिसांनी चोरीला गेलेल्या दुचाकीच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीची ओळख पटली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आरोपी गणेश बिराजदार याला ट्रान्सपोर्टनगरातून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी दोन लाख रुपये किंमतीची तीन वाहने जप्त केली. त्याच्या अटकेमुळे निगडी पोलीस ठाणे येथे दोन तर देहूरोड येथे एक असे तीन गुन्हे तपासाअंती उघड झाले आहेत. ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, मच्छिंद्र घनवट, तात्या तापकीर, मंगेश गायकवाड, नारायण जाधव, आनंद चव्हाण, नितीन बहिरट यांनी केली.