वाहने फोडणारा एकजण रंगेहाथ सापडला

0

डडुळगाव ग्रामस्थांनी दिला बेदम चोप; टोळके मात्र पसार

पिंपरी-चिंचवड : रस्त्यावर लावलेली वाहने फोडण्याचे सत्र शहरात सुरू असताना, बुधवारी आळंदी-मोशी येथेही एका टोळक्याने दहशत पसरवत दोन मोटारी फोडल्या. मात्र, आवाजामुळे जाग आलेल्या ग्रामस्थांनी एकजुटीने घराबाहेर धाव घेताच टोळके पसार झाले. परंतू, त्यातील अनिल गणेश थोटे (वय 25 रा. संत तुकारामनगर, भोसरी) दुचाकीवरुन पडल्याने ग्रामस्थांच्या तावडीत सापडला. संतप्त ग्रामस्थांनी त्याला बेदम चोप दिला. ही घटना बुधवारी (दि.17) रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली.

गाडीवर पडला आणि ग्रामस्थांनी धरला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोटे व त्याचे आठ ते नऊ साथीदार रात्री डुडुळगाव दुचाकींवरून परिसरात गेले. नंतर हातातील लोखंडी गज, कोयता, काठ्या यांच्या सहाय्याने रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड सुरू केली. तसेच शिवीगाळ करत परीसरात दहशतही पसरवली. एमएच 14 ईवाय 1711, एमएच 14 ईवाय1006 या मोटारींचे मोठे नुकसा झाले. दरम्यान, तोडफोडीचा आवाज ऐकून नागरिक बाहेर आले असताना थोटे याने तेथून पळ काढला. मात्र, दुचाकीवरुन जात असताना तो पडला. यावेळी संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. यामुळे त्याला ‘वायसीएम’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याच्याकडून सर्व साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत.याप्रकरणी सिद्धेश बापुसाहेब वहिले (वय 27 रा. डुडुळगाव) यांच्या फिर्यादीनुसार भोसरी पोलीस ठाण्यात तोडफोड व दहशत पसरवण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साथीदारांची नावे निष्पन्न
जखमी थोटे याच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली असून त्याच्या सर्व साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहे. सर्वजण गुंड प्रवृत्तीचे असून केवळ दहशत बसावी यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. त्यांना पकडल्यानंतर त्यांनी आजवर कोठे कोठे असे प्रकार केले आहेत, हे उघडकीस येईल, असे पोलिसांनी सांगितले.