वाहन कर्जापोटी घेतला तनिष्काचा बळी!

0

पिंपरी-चिंचवड : कर्जफेड करता आली नाही म्हणून आत्महत्या करणारे शेतकरी आपण पाहिले आहेत. परंतु, कर्जाऊ घेतलेल्या कारचे हप्ते फेडता आले नाही म्हणून चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवडमधील वडमुखवाडी येथे उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अपहरण केल्यानंतर चिमुकलीच्या वडिलांना खंडणी मागण्याआधीच नराधमांनी तिचा उशीने तोंड दाबून खून केला होता. तसेच, मृतदेह अकोला जिल्ह्यात नेऊन अर्धवट जाळला व गाडून टाकला होता. आरोपी हा या चिमुकलीच्या घरीच भाडेकरु होता. या घटनेने दिघी परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीसह त्याच्या अन्य मित्राला अटक केली आहे. सद्या आरोपी पोलिस कोठडीत आहेत. तनिष्का बेपत्ता झाल्यानंतर आरोपीच तिच्या शोधाचे नाटक करत होता. त्यामुळे सुरुवातीला कुणाचाही त्याच्यावर संशय गेला नाही. परंतु, पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने केवळ त्याच्या शारीरिक हालचालीवरून आरोपी हेरला होता.

वडिलांना होता ओळखीच्या व्यक्तीवर संशय
दिघी परिसरातील चर्‍होलीतील वडमुखवाडी येथे राहणारे अमोल आरुडे यांच्याकडे शुभम विनायकराव जामनिक (वय 22) व प्रतिक उर्फ गोलू अरुण साठले (वय 23) हे आरोपी भाडेकरू म्हणून राहात होते. यातील शुभम याने कार विकत घेतली होती. त्यासाठी त्याने कार लोन काढले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने घरमालकाची चारवर्षीय चिमुकली तनिष्का हिचे अपहरण केले व तिचे वडिल अमोल आरुडे यांना खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. परंतु, तनिष्का आपले बिंग फोडेल या भीतीपोटी त्याने अपहृत तनिष्काचे उशीने तोंड दाबून जीव घेतला. त्यानंतर शिताफीने मृतदेह त्याच कारमध्ये टाकून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर गाठले व तेथे हा मृतदेह रॉकेल टाकून जाळला आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत तो पुरून टाकला. तनिष्का बेपत्ता झाल्याची तक्रार दिघी पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सर्वत्र तिचा शोध घेतला. परंतु, ती सापडली नाही. त्यामुळे मुलीला कुणी तरी ओळखीच्या व्यक्तीनेच पळवून नेले असावे, असा संशय तिचे वडील अमोल यांनी व्यक्त केला. कारण, तनिष्का ही अनोळखी व्यक्तीकडे अजिबात जात नव्हती. तर तनिष्काच्या शोधासाठी आरोपी शुभम हा स्वतः प्रयत्न करत असल्याचे दिसून येत होते. वडिलांच्या संशयानंतर पोलिस उपनिरीक्षक हरिष माने यांना शुभम जामनिक याची देहबोली संशयास्पद वाटली. त्यांनी त्याची चौकशी केला असता, आरोपीच हाती आला.

नवीन कारवरून पोलिसांना आला आरोपीचा संशय
दिघी पोलिस ठाण्याचे हरिष माने व त्यांचे सहकारी शक्यता असलेल्या सर्व ठिकाणी तनिष्काचा शोध घेत होते. तर अमोल आरुडे यांनी हे ओळखीच्याच माणसाचे काम असल्याचा तगादा पोलिसांकडे चालू होता. त्यातच शुभम जामनिक याने नवीन कार घेतली होती, याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी शुभमला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुलीच दिली. शुभम याने बँकेतून कर्ज घेतले होते. त्याचे हप्ते फेडता येत नसल्याने त्याने तनिष्काचे अपहरण केले व खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. परंतु, खंडणी मागण्यापूर्वीच त्यांनी तनिष्काचा निर्दयीपणे जीव घेतला होता. तनिष्का ही आरोपीच्या अंगाखांद्यावर खेळत होती. तरीही तिचा जीव घेताना त्यांच्या काळजाला पाझर फुटला नाही, असा संताप परिसरातून व्यक्त होत आहे. आरोपीच्या माहितीनुसार, अपहरण केल्यानंतर तनिष्काने आरोपींना विरोध केला होता. त्यामुळे तिला चूप करण्यासाठी तिचा उशीने तोंड दाबून गुदमरून जीव घेतला. तिचा मृतदेह एका प्लॅस्टिक थैलीत घालून मूर्तिजापूर येथे घेऊन गेले. अर्धवट जळलेला हा मृतदेह पोलिसांनी हस्तगत केला असून, शवपरीक्षण केले असता तो तनिष्का हिचाच आढळून आला आहे. या दोन्हीही आरोपींना शिवाजीनगर न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावलेली आहे.