वाहन चालवतांना स्वतःची काळजी करा

0

जळगाव । प्रवास करताना वाहनाची गती मर्यादित हवी. कारण अपघात होण्याचे प्रमाण दिवसागणिक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दहशतवाद, भूकंप किंवा सुनामी यामध्ये जितकी जीवित हानी होत नाही त्यापेक्षा जास्त अपघातात मृत्यू पावतात. वाहनाची नियमावली पाळणे जसे नागरिकांना संकट टाकल्यासारखे वाटते. रस्त्याने वाहन चालविताना किंवा पायदळ चालताना सुरक्षित प्रवास करणे महत्वाचे आहे. आपण जरी नियमांचे पालन करीत असू परंतु समोरील चालकाच्या चुकीने अपघात होऊ शकतो. त्यामुळे वाहन चालविताना स्वतःची काळजी घ्या असे मत शहर वाहतूक शाखेचे एस.बी.भामरे यांनी व्यक्त केले.

जळगाव अपघातग्रस्त जिल्हा
जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात रस्ता सुरक्षा या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, वाहतूक शाखेचे पीएसआय सतीश जोशी, जिल्हा वाहतूक शाखेचे पीएसआय दिलीप पाटील, हेड कॉन्स्टेबल भरत पाटील, विभागप्रमुख प्रा.दिप्ती सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना भामरे म्हणाले की, हेल्मेट, सिटबेल्टचा वापर करा, सिग्नलचे नियम पाळा, ओव्हरटेक करताना काळजी घ्या, चुकीच्या दिशेने वाहन चालवू नका, प्रवास करताना घाई करू नका, तसेच प्रवास करताना वाहनाचे आवश्यक कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे. 2014 आकडेवारीनुसार दर तासाला 47 लोक अपघातात मृत्यू पावतात असेही त्यांनी सांगितले.जगाच्या पाठीवर दोन महायुद्ध झाली आहेत. आता तिसरे महायुद्ध म्हणजे रस्त्यावर होणारे अपघात आहेत. धावत्या जगात प्रत्येकाला वाहनाची गरज आहे. त्यामुळे माणसांच्या बरोबरीने वाहने झाली आहे. तसेच जळगाव जिल्हा अपघात ग्रस्त जिल्हा ठरला आहे असे पीएसआय दिलीप पाटील यांनी सांगितले.