वाहन चालवितांना वेग मर्यादेसह सुरक्षेचाही विचार आवश्यक

0

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे प्रतिपादन

जळगाव : वाहन चालवितांना वेग मर्यादा ,वाहतूक नियमांचे पालनाबरोबरच आपल्यासोबत असलेल्या सहकार्याचा,सहप्रवाश्याचा आणि रस्त्यावर चालणार्‍या पादचार्‍यांच्याही सुरक्षेचा विचार वाहनचालकाने केल्यास सुरक्षा अबाधित राहून जिवीत तसेच वित्त हानी टाळता येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा रस्ता सुरक्षा समिती जळगाव श्याम लोही, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,जळगावचे प्रकल्प संचालक सी.एम.सिन्हा, नहीचे हितेश अग्रवाल,मनपाचे सी.एस.सोनगिरे, पोलिस विभाग, राज्य परिवहन विभाग , शिक्षण् विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच मक्तेदार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे पुढे म्हणाले की, रस्ता सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करताना अनेक अडथळे येतात त्यात प्रामुख्याने पार्किंग प्रश्न, नो एन्ट्रीच्या ठिकाणी वाहने उभी करणे, चुकीच्या पद्धतीने वाहने पार्क करणे. यामुळे रस्ता वाहतुकीला अडचणी येतात. अवैध वाहतूकीला आळा बसविण्यासाठी जिल्हा प्रादेशिक परिवहन, पोलीस विभागाचा वाहतूक विभाग आणि राज्य परिवहन मंडळाने समन्वयाने काम केल्यास अवैध वाहतूकीला आळा बसण्याबरोबरच राज्य परिवहन मंडळाच्या उत्पनात वाढ होण्यास मदत होईल.त्यासाठी राज्य परिवहन मंडळाने यात्रा, बाजार, उत्सव अशा प्रसंगी विशेष जादा बसेसची व्यवस्था केल्यास प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होवून मंडळाच्या उत्पनातही वाढ होईल, अनधिकृत वाहने आणि मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी किंवा विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांचे परवाने तात्काळ रद्द करावेत. शाळा महाविद्यालयांमध्ये पालक-शिक्षक सभांना वाहतूक पोलीस व परिवहन विभागातील अधिकार्‍यांनी उपस्थित राहून वाहनाच्या मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवास करण्याने आपल्या पाल्याच्या जिवापेक्षा पैसा महत्वाचा नसून 200 ते 300 रूपये जास्त लागत असल्यास व मर्यादित संख्येत विद्यार्थी घेवून जाणार्‍या वाहनातूनच आपल्या पाल्याला पाठवावे असे त्यांचे प्रबोधन करावे.

रस्ते नुतनीकरणावेळी गुणवत्ता लक्षात घ्या

रस्ते बांधणीतील यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्टीय महामार्ग प्रकल्प, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग यांनी बांधकाम यांनी रस्ते तयार करतांना किंवा दुरूस्ती तथा नुतनी करणाच्या वेळेस मक्तेदारांची गुणवत्ता लक्षात घ्यावी. शहर, गाव किंवा अन्य कोणत्याही ठिकणी तयार केलेले अनावश्यक गतीरोधक तात्काळ काढून टाकावेत. रस्तांचे कामे चालू असतांना अपघात व वाहन धारकांना त्याची कल्पना येणासाठी मक्तेदारांनी आवश्यक दिशानिर्देशक फलक, बॅरिकेट्स लावणे आवश्यक आहे. ते लावले गेले नसल्यास अशा रस्ते बनविणार्‍या मक्तेदारांवर कठोर कारवाई करावी अशा सुचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या.