पुणे । पुणे शहर व जिल्हा तसेच कर्नाटक आणि मध्यप्रदेशातून दुचाकी चोरणार्या एका सराईताला संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून तब्बल साडे पाच लाख रुपयांच्या 18 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सोहेल सुनिल नानावत (वय 23, रा. यवत) असे त्याचे नाव आहे, अशी माहिती उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले व पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान यातील मुख्य आरोपी फरार असून लखन उर्फ अमोल विलास देशमुख (रा. बारामती) हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
शहरातून दररोज वाहन चोरीच्या घटना होत आहेत. पार्किंग केलेल्या दुचाकी काही वेळातच चोरटे लंपास करत आहेत. दरम्यान संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकातील कर्मचारी दिपक भुजबळ यांना सोहेल चोरीची दुचाकी घेऊन मित्राला भेटण्यासाठी खडकी परिसरातील अंडी उबवणी केंद्राजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडे, उपनिरीक्षक पी. डी. गायकवाड, कर्मचारी राज देशमुख, रमेश भिसे, प्रदीप शेलार यांच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून सोहेलला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान दुचाकी चोरल्याची माहिती त्याने दिली. तसेच, शहर, पुणे जिल्हा, मध्यप्रदेश व कर्नाटक येथून लखनसोबत दुचाकी चोरल्याचे त्याने सांगितले.