वाहन रीव्हर्स घेताना घंटागाडीचा धक्का लागल्याने भुसावळ शहरातील वयोवृद्धेचा मृत्यू

प्रभात कॉलनीजवळील दत्त मंदिराजवळ घडली दुर्घटना : घंटा गाडी चालकविरोधात शहर पोलिसात

Elderly woman killed by bell jar while reversing vehicle भुसावळ : शहरातील प्रभात कॉलनीत कचर्‍याची गाडी (घंटागाडी) रीव्हर्स घेताना वृद्धेला धक्का लागल्याने वृद्धा जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार, 1 रोजी सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. नलिनी पंढरीनाथ पाटील (79, प्रभात कॉलनी, भुसावळ) असे मयत वृद्धेचे नाव आहे. या प्रकरणी घंटागाडी चालकाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाहन रीव्हर्स घेताना दुर्घटना
सूत्रांच्या माहितीनुसार, पालिकेने घर-घर घंटागाडी सुरू केली असून शहरातील प्रभात कॉलनीतील दत्त मंदिराजवळ दररोजप्रमाणे घंटागाडी (एम.एच.19 सी.वाय.2787) ही आल्यानंतर वयोवृद्धा नलिनी पाटील या कचरा टाकण्यासाठी गाडीजवळ पोहोचल्या मात्र याचवेळी वाहन रीव्हर्स घेतले जात असताना वयोवृद्धेला वाहनाचा धक्का लागल्याने त्या वाहनाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अनंत पंढरीनाथ पाटील (48, प्रभात कॉलनी, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, घंटागाडी चालक दिलीप एकनाथ जाधव (पंढरीनाथ नगर, भुसावळ) याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय संजय वासुदेव कंखरे करीत आहेत.