वाहन विक्रेत्यांकडून पार्किंगचे नियम धाब्यावर

0

नेरुळ । कोपरी गाव सेक्टर 26 पामबीच मार्गावरिल वाहन विक्रेत्यानी पार्किंग नियामालाच हरताळ फासला आहे. पावनेश्‍वर उड्डान पुल ते अरेंजा कॉर्नर हा संपूर्ण परिसर नो पार्किंग म्हणून घोषित केला आहे. तसे फलक पण लावण्यात आले होते. मात्र येथील वाहन विक्रेत्यांनी कहरच केला आहे. विशेष म्हणजे म्हणजे येथील वाहन विक्रेत्यांनी आपली वाहने पदपथावर लावू नये म्हणून महापालिका प्रशासनाकडून रास्त्याच्या किनारी लोखंडी जाळी देखील बसविली आहे. मात्र ही जाळी आणि नो पार्किंगचे बोर्ड लावूनसुद्धा वाहन विक्रेते आपली वाहने बिनधास्तपणे बस थांब्यावर, पदपथावर व रस्त्यावर विक्रीसाठी ठेवतात. कोपरी गाव सेक्टर 26 पाम बिच मार्गावरिल वाहन विक्रीचा धंदा ‘कार बाजार’ या नावाने सर्वदूर परिचित आहे. त्यामुळे येथे दररोज शेकडो ग्राहक आपल्या बजेट नुसार वाहन खरेदीसाठी येतात. शिवाय या ठिकाणी नो पार्किंग झोन असून सुद्धा येथे राजरोस वाहन विक्रेते आपली वाहने विक्रीसाठी रस्त्यावर व पदपथावर उभी करतात. त्यामुळे येथे दररोज वाहतूक कोंडी तर होतेच शिवाय पादच्यार्‍याना चालण्यास अडथळा निर्माण होतो.

नवी मुंबई महानगरपालिकेने सध्या रस्तावर अवैधपणे व्यवसाय करणार्‍या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा सपाटाच लावला आहे, तर वाहतूक नियम तोडणार्‍या वाहन चालकांवर वाहतूक विभागातर्फे कारवाईचा बडगा उगारला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका व नवी मुंबई वाहतूक पोलीस विभाग यांच्यावतीने शहरातील वाहन पार्किंगची समस्या लक्षात घेता महापालिका क्षेत्रात वन साइड पार्किंग, वन वे टू वन वे तर कुठे नो पार्किंग झोन तयार करुन वाहन पार्किंगचे नियोजन केले आहे. त्या नुसार शहरात ठिकठिकाणी नो पार्किंगचे फलक सुद्धा लावले आहेत. दर 15 मीटरच्या अंतरावर येथे नो पार्किंगचे बोर्ड बसवलेले आहेत. परंतु, या बोर्डाखालीच वाहने विक्रीसाठी उभी केली जातात तसेच येथे असलेल्या बस स्टॉपवरदेखील वाहने उभी असतात. त्यामुळे बसची वाट पाहणार्‍या प्रवाशांना रस्त्यात उभे राहून बसची वाट पाहावी लागते.

प्रशासनाबाबत नाराजी
आपली वाहने हे विक्रेते मात्र खुलेआम येथे उभी करतात. त्यामुळे महापालिका आणि वाहतूक विभाग यांच्या करवाईवर शंका उपस्थित होत असून वाहतूक पोलीस विभाग आणि महापालिका अतिक्रमण विभाग या वाहन विक्रेत्यांकड़े जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात का? असा सवालही विचारला जात आहे. आपल्यावर कोणीच कारवाई करणार नाही, अशा आविर्भावात येथील वाहन विक्रेते वागत असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस यांच्यामार्फत केले जात आहे आणि दूसरीकडे या बेशिस्त वाहन विक्रेत्यांकडे दुर्लक्ष करायचे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या या भूमिकेबाबत सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

कोपरी गाव विभाग सध्या आमच्या तुर्भे विभागात वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जर येथील वाहन विक्रेते बेकायदेशीरपणे आपली वाहने पदपथावर विक्रीसाठी उभी करत असतील, तर त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल.
– अनंत जाधव
(तुर्भे विभाग अधिकारी)