सध्या सोशल मीडियातील फेक न्यूज हा चिंतेचा विषय बनला आहे. कोणत्याही घटनेची शहानिशा न करता या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अफवा पसरवण्यात येतात. अनेकदा यावरून रक्तरंजित अध्याय घडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये नुकताच एका फेसबुक पोस्टवरून झालेला वाद आणि त्यानंतरच्या दंगलींचा अध्याय आपल्यासमोर आहे तसेच सोशल मीडियातील दुसरा पैलू म्हणजे थिल्लरपणा होय. खरं तर या माध्यमातून पारंपरिक प्रसारमाध्यमांना एक अतिशय सक्षम असा पर्याय उभा राहिला आहे. सर्वसामान्यांना यातून अभिव्यक्तीसाठी ग्लोबल अॅक्सेस असणारे साधन मिळाले आहे. तथापि, याचा वापर सुजाणपणे होण्याऐवजी कुणावर मुद्दाम चिखलफेक करण्यासाठी होत असल्यास याचे समर्थन कुणीही करू शकणार नाही. या अनुषंगाने बहुतांश वेळेस विनोदाच्या नावाखाली विक्षिप्तपणा करणार्या ऑल इंडिया बकचोद म्हणजेच एआयबी या कॉमेडी ग्रुपचे ताजे कृत्य हे अत्यंत निंदनीय असेच आहे. या ग्रुपने आपल्या ट्विटर अकाउंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रेल्वे स्टेशनवर स्मार्टफोनवरून स्नॅपचॅट या अॅपचा वापर करताना दर्शवले आहे, तर दुसर्या छायाचित्रात त्यांनी आपल्या फोटोवर डॉगी फिल्टर वापरून प्रतिमा शेअर केल्याचे दाखवण्यात आले आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर असणार्या व्यक्तीविषयी अशा पद्धतीने फोटो मॉफिर्र्ंग करणे हे अर्थातच अनैतिक आणि बेकायदेशीर आहे. या ट्वीटवरून गहजब झाल्यानंतर अखेर एआयबीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या कॉमेडी ग्रुपचा सदस्य तन्मय भट याने आपण भविष्यात याच पद्धतीने विनोद करतही राहू आणि ट्वीट डिलीटही करत राहू, अशी प्रतिक्रिया देत आपला मुजोरपणा दाखवून दिला आहे. तन्मय भट याचा हा मुजोरपणा निश्चितच संताप आणणारा आहे. पंतप्रधान हे कोणत्या पक्षाचे नसतात तर ते संपूर्ण देशाचे असतात, इतकं साधं भानही एआयबीच्या लोकांना नसावे, याचेच नवल वाटते. तसेच देशाच्या सर्वोच्च पदापैकी एका पदावर लोकानुमते विराजमान झालेल्या व्यक्तिबद्दल सोशल मीडियात अशा तर्हेने व्यक्त होणे, हे देशाची प्रतिमा मलिन करणारेच कृत्य आहे, ही बाबही तन्मय भट आणि त्याच्या सहकार्यांनी लक्षात घेतली पाहिजे. अन्यथा, भविष्यात त्यांना त्यांच्या मुजोरपणाची किंमत नक्कीच मोजावी लागेल.
एआयबीच्या विकृतीवर आता कायदेशीर कारवाई काय होईल ती होवो, पण या माध्यमातून हा अतिशय संवेदनशील मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एआयबी हे आधुनिक युगाचे अपत्य मानावे लागेल. तन्मय भट, गुरूसिमरन खंबा, रोहन जोशी आणि आशिश शाक्य हे या ग्रुपचे सदस्य आहेत. पॉडकास्ट आणि यू-ट्युबवरील व्हिडिओजच्या मदतीने हे सर्व जण विविध विनोदी एपिसोड जगासमोर सादर करतात. त्यांच्या यू-ट्युबवरील चॅनलला पावणे चोवीस लाखांपेक्षा जास्त सबक्रायबर्स असून, याच्या जाहिरातींच्या माध्यमातून त्यांना रग्गड उत्पन्न मिळत असते. याशिवाय तर फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातूनही विविध विषयांवर मल्लिनाथी करत असतात. आधुनिक युगाची भाषा बोलणार्या एआयबीच्या बहुतांश व्हिडिओजमध्ये शिव्यांचा विपुल वापर करण्यात आला असतो. अर्थात या प्रकारची कथित कॉमेडी ही का पाहावी? हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, या माध्यमातून जर कुणावर अत्यंत विकृत पद्धतीची चिखलफेक होत असेल तर ही बाब अतिशय गंभीर अशीच मानावी लागेल. एआयबी वादात पडण्याचा हा पहिला प्रसंग नाही. आजवर या ग्रुपविरुद्ध अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. विशेष करून यातील भाषेवर अनेकांचा आक्षेप आहे. मध्यंतरी या समूहाविरुद्ध ख्रिस्ती समुदायाने आक्रमक भूमिका घेतली होती. यामुळे त्यांना विनाशर्त माफी मागावी लागली होती. याशिवाय अनेक मान्यवरांविरुद्धच्या कॉमेंटही वादात सापडल्या आहेत. यात गेल्या वर्षी तन्मय भट हा लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांची नक्कल करण्याच्या नादात भलताच घसरला होता. यावरून प्रचंड वादही झाले होते. मात्र, या सर्वांपेक्षा नरेंद्र मोदी यांच्या अपमानाचे प्रकरण याहून गंभीर आहे.
विनोद निर्मितीसाठी कोणत्याही नेत्यासह सार्वजनिक जीवनात वावरणार्या व्यक्तीचे व्यंगचित्र, रेखाचित्र आदींपासून ते फोटो मॉर्फ करण्यास कायद्याने बंदी नाही. अगदी काही वृत्त वाहिन्यांवर तर विद्यमान राजकीय घटनांवर भाष्य करण्यासाठी कार्टूनचा अतिशय समर्पक वापर करण्यात येतो. यातील काही भाग तर अतिशय भन्नाट असेच असतात. मात्र, हा सर्व भाग समाजमान्य निखळ विनोदाचा भाग होय. तथापि, एआयबीने वाह्यातपणाचा कळस गाठत पंतप्रधानांना डॉगी फिल्टर लावण्याचा प्रकार अश्लाघ्य असून, याबाबत कठोर कारवाई होण्याची अपेक्षा आहे. भट आणि त्याचा कंपू माफी मागून या सर्व प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र, हे प्रकरण निव्वळ माफीच्या लायकीचे नक्कीच नाही. सार्वजनिक जीवनात वावरण्याचे काही नीतीनियम असतात. अगदी प्रसारमाध्यमांनाही कुणाच्या अब्रूवर शितोेेंडे उडवण्याचा अधिकार नाही, असे झाल्यास संबंधितांवर कारवाईसाठी कायदेशीर तरतूद आहे. याच पद्धतीने समाजमाध्यमातून होणार्या अभिव्यक्तिवरही याच पद्धतीचे नियम लागू असल्याची बाब विसरता कामा नये. याचा विचार करता एआयबीच्या वाह्यातपणाला वेळीस वेसण घालण्याची आवश्यकता आहे, अन्यथा भविष्यात असलेच प्रकार विविध विकृतींच्या माध्यमातून आपल्यासमोर येत राहतील हे निश्चित.