वाॅटरकप स्पर्धेसाठी सरकारकडून दिले जाणार ९० कोटींचे इंधन!

0

सहभागी प्रत्येक गावांना सरकारकडून दीड लाखांचे इंधन
५ हजार ९०० गावे वॉटर कप स्पर्धेत सहभागी होणार

मुंबई –  राज्यामध्ये जलसंधारणासाठी महत्वाचे काम करणाऱ्या आणि अभिनेता अमीर खानच्या संकल्पनेतून साकार झालेल्या वाॅटरकप स्पर्धेसाठी शासनाकडून देखील मदतीचा हात पुढे आला आहे. सन 2018-19 पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेत जी गावे सहभागी होणार आहेत त्या गावांमध्ये मशीनद्वारे करण्यात येणाऱ्या कामासाठी इंधनाच्या खर्चापोटी प्रत्येकी दीड लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या स्पर्धेत सहभागी जवळपास सहा हजार गावांसाठी ९० कोटी रुपयांचे इंधन सरकारकडून दिले जाणार आहे. हा निधी जलयुक्त शिवारच्या निधीमधून दिला जाणार आहे.

2016-17 पासून राज्यात पाणी फाउंडेशनद्वारे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी ८ ते २२ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी ही गावे सज्ज झाली आहेत. ‘सत्यमेव जयते वॉटरकप’ स्पर्धा तिसऱ्या वर्षी ८ एप्रिलला सुरू होणार आहे. राज्यामधील २४ जिल्ह्यांतील ७५ तालुके व त्यामधील सुमारे ५ हजार ९०० गावे वॉटर कप स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमुळे राज्यात जलसंधारणची चळवळ उभी राहत असल्याचे सांगत सरकारकडून स्पर्धेतील गावांचा उत्साह टिकावा आणि जास्तीत जास्त पाणीदार गावे व्हावीत यासाठी सहभागी होणा-या गावास इंधनापोटी प्रति गाव ₹ 1.50 लक्षच्या मर्यादेत निधी दिला जाणार आहे.

टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानास पूरक म्हणून विविध खाजगी व्यक्ती अशासकीय संस्था, ग्रामपंचायत हे यंत्रसामग्री उपलब्ध करून देतात व त्यांना इंधनासाठी निधी उपलब्ध करून देतात. सरकारकडून या स्पर्धेसाठी आधी जिल्हा नियोजन समितीमधून मदत केली जायची मात्र या वर्षी पासून सरकार स्वता जलयुक्त शिवारच्या निधीतून ₹ 1.50 लक्ष निधी इंधनासाठी देणार आहे.