विंडीजचा भारतावर 11 धावांनी विजय

0

अँटिग्वा । पाच सामन्यांच्या मालिकेतील, कमी धावसंख्या असलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला 11 धावांनी हरवले. वेस्ट इंडिजच्या 8 बाद 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव 50 व्या षटकात 178 धावांवर आटोपला. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने 27 धावांमध्ये 5 विकेट्स मिळवत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. या मालिकेत भारतीय संघ 2-1 असा आघाडीवर असून शेवटचा सामना 6 जुलै रोजी किंग्सटन (जमैका) येथे खेळला जाईल. कर्णधार होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या पाच फलंदाजांनी 20 हून जास्त धावांचे योगदान दिले. मधल्या षटकांमध्ये विंडीजचा संघ 4 बाद 154 असा सुस्थितीत होता. पण भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाच्या फलंदाजांन वेसण घालताना विंडीजला 50 षटकांमध्ये 9 बाद 189 धावांवर गुंडाळले. उमेश यादव आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 3 विकेट्स मिळवल्या. कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या. 2015 च्या विश्‍वचषक स्पर्धेनंतर पहिलाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्‍या शामीला या सामन्यात एकही फलंदाज बाद करता आला नाही.

जडेजा बाद झाला अन्…
या सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर होता. डावातील 47व्या षटकात भारताची धावसंख्या 6 बाद 171 अशी होती. पण कर्णधार जेसन होल्डरने रवींद्र जडेजाची (11) विकेट मिळवत सामन्याचे चित्रच पालटवून टाकले. त्यानंतर 49 व्या षटकातील, केसरीक विल्यम्सच्या शेवटच्या चेंडूवर धोनीही बाद झाल्याने सामना भारताच्या हातातून निसटला. शेवटच्या षटकात होल्डरने आणखी 2 विकेट्स मिळवत भारताला 178 धावांवरच रोखले.

16 वर्षांतील लाजिरवाणा विक्रम धोनीच्या नावे
या लो स्कोरिंग मॅचमध्ये भारताच्या पराभवासोबतच आणखी एक कारण आहे, ज्यामुळे हा सामना लक्षात राहणार आहे आणि कारणेही तसेच आहे. माजी कर्णधार एम. एस. धोनीचे सर्वात संथ अर्धशतक. धोनीने या सामन्यात 108 चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. धोनीच्या करिअरमधील हे सर्वाधिक संथ गतीने केलेलं अर्धशतक आहे. धोनीच्या विपरित बॅटिंगमुळे त्याच्या नावावर नवा विक्रम नोंदला गेला. तळाच्या फजंदाजांची उडालेली तारांबळ आणि धोनीची संथ खेळी यामुळे भारताला 190 धावांचं माफक लक्ष्यही गाठता आले नाही. अत्यंत संथ खेळीमुळे धोनी सध्या टीकेचा धनी बनला आहे.