विकलांगांना कार्यक्षम करणे आवश्यक : डॉ. विकास आमटे

0

वारजे । देशातील विकलांगांची संख्या मोठी असून त्यांच्याकडे काम करण्याची क्षमता असते. ही क्षमता ओळखून त्यांना कार्यक्षम बनविणे आवश्यक आहे, असे मत ‘आनंदवन’चे विश्‍वस्त डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केले. लायन्स क्लब ऑफ पुणे सिनिअर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सेवा पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होेते. यावेळी शरदचंद्र पाटणकर यांच्या हस्ते जनसेवा फाउंडेशनचे डॉ. विनोद शहा, संजीवन रुग्णालयाचे डॉ. ॠतूपर्ण शिंदे, मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील शिंदे, ‘इस्कॉन’चे श्‍वेतदीप दास, कल्पतरू नेत्ररुग्णालयाचे विनोद कपूर, कॅन्सर डायग्नोस्टिक सेंटरचे सी.डी. शेख यांना प्रत्येकी एक लाखांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. यावेळी सदानंद शेट्टी, डॉ. अनिल तोष्णीवाल आदी उपस्थित होते.

विकलंगांची उपेक्षा न करता त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील कार्यक्षमता जागृत करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनविणे हीच खरी समाजसेवा आहे. शरदचंद्र पाटणकरांसारख्या दानशूर व्यक्तीने वेळोवेळी आनंदवन संस्थेला आर्थिक सहकार्य केले असल्याचे डॉ. आमटे यांनी यावेळी नमूद केले. सेवाभावी वृत्तीने काम करणार्‍या संस्था आणि व्यक्तींना लायन्स क्लबच्या वतीने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. हे पुरस्काराचे तिसरे वर्ष आहे, असे पाटणकर यांनी नमूद केले. यावेळी शेट्टी, पाटणकर, डॉ. तोष्णीवाल, डॉ. शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. श्याम भुर्के यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.