विकलेल्या जमिनींचे पुन्हा खरेदीखत करून फसविले!

0

खेमचंद भोजवानीचा पत्रकार परिषदेत आरोप

पिंपरी-चिंचवड : जमीन मालकाच्या अपरोक्ष एकदा विकलेल्या जमिनीचे खरेदीखत करून बांधकाम व्यावसायिक नरेश ठाकूरदास वाधवानी यांनी तब्बल सहा कोटी 92 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप खेमचंद उत्तमचंद भोजवानी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच याप्रकरणी वाधवानी यांच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे भोजवानी यांनी सांगितले.

नेमके काय आहे प्रकरण?
पत्रकार परिषदेत बोलताना खेमचंद उत्तमचंद भोजवानी म्हणाले की, पिंपळे सौदागर येथील सर्व्हे नं. 40 मधील 120 आर क्षेत्राची जमीन जनाबाई जयवंत काटे, कै. चंद्रकांत काटे व त्यांचे वारस वैशाली चंद्रकांत काटे, सुरेश जयवंत काटे, राजू जयवंत काटे व संतोष जयवंत काटे यांच्या मालकीची होती. या सर्व वारसांनी या जमिनीसाठी 30 डिसेंबर 2002 रोजी मे. ओम इस्टेट या भागीदारी संस्थेशी विकसन करारनामा व कुलमुखत्यारपत्र लिहून दिले. त्यानंतर ओम इस्टेट या संस्थेने सर्व्हे नंबर 40 मधील 120 आर जमिनीपैकी 83.6120 आर एवढी जमीन विकसनासाठी मे. प्रीत होम्स या संस्थेला 16 ऑक्टोबर 2004 रोजी विकसन करारनामा व कुमुखत्यारपत्रान्वये लिहून दिली. उर्वरित 36.3880 आर एवढ्या जमिनीचे हक्क मे. ओम इस्टेट या संस्थेने स्वतःकडे विकासनाकरिता राखून ठेवले.

त्यानंतर मे. एम. बी. ए. डेव्हलपर्स या कंपनीतर्फे मी आणि माझे सहकारी कन्हैयालाल होतचंद मतानी यांनी 25 ऑक्टोबर 2010 रोजी सर्व्हे नंबर 40 मधील 120 आर या जमिनीपैकी 36.3880 आर जमीन ओम इस्टेट यांच्याकडून तर 83.6120 आर जमीन प्रीत होमस यांच्याकडून जमिनीचे मूळ मालक जनाबाई जयवंत काटे, चंद्रकांत काटे, सुरेश जयंत काटे, राजू जयवंत काटे, संतोष जयवंत काटे, मंदा दिलीप खांदवे (रा. लोहगाव, ता. हवेली) यांच्या सांगण्यावरून जमिनीची खरेदी व विकासनाचे हक्क नोंदणीकृत खरेदी व विकसन करारान्वये प्राप्त केले. या व्यवहारात ओम इस्टेट व प्रीत डेव्हलपर्स यांना व्यवहाराचे सहा कोटी 32 लाख रुपये सेवा विकास बँकेच्या चेकद्वारे दिले. तसेच जमिनीचे मूळ मालक व यांच्या व्यवहारात राहिलेली मोबदल्याची 60 लाख रुपये रक्कम सेवा विकास बँकेच्या चेकद्वारे दिली. यानुसार सदर 120 आर जमिनीवर विकासनाचा हक्क मे. एम. बी. ए. डेव्हलपर्स यांना मिळाले.

तडजोडीतील अटीही पाळल्या नाहीत!
खेमचंद भोजवाणी म्हणाले की, मंगलमूर्ती डेव्हलपर्सतर्फे नरेश ठाकूरदास वाढवानी यांनी जमिनीचे मूळ मालक जनाबाई जयवंत काटे, कै. चंद्रकांत काटे यांचे वारस वैशाली काटे, सुरेश जयंत काटे, राजू जयवंत काटे, संतोष जयवंत काटे यांच्याशी संगनमत करून 10 सप्टेंबर 2011 रोजी फसवणूक करण्याच्या इराद्याने दुय्यम निबंधक, हवेली या कार्यालयातून जाणीवपूर्वक ‘सर्च टायटल रिपोर्ट’ न घेता तसेच वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धीची नोटीस न देता 9 सप्टेंबर 2011 रोजी नरेश ठाकूरदास वाधवानी यांनी सदर जमिनीचा विकसन करारनामा केला. संपूर्ण 120 आर एवढी जमीन नरेश वाधवानी याने आपल्या नावावर करून घेतली आहे.

6 कोटींची फसवणूक
नरेश वाधवानी याने मला तडजोड करण्यास सांगितले. मी तडजोड करण्यासदेखील तयार झालो. 19 ऑक्टोबर 2013 रोजी तडजोड पत्र तयार करण्यात आले. या तडजोड पत्रातील अटी व शर्तींचे पालन नरेश वाधवानी याने आजपर्यंत केले नसून माझी तब्बल सहा कोटी 92 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत नरेश ठाकूरदास वाधवानी आणि जनाबाई जयवंत काटे, कै. चंद्रकांत काटे यांचे वारस वैशाली काटे, सुरेश जयंत काटे, राजू जयवंत काटे, संतोष जयवंत काटे यांच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही भोजवानी यांनी सांगितले.