शिरूर । शिरूर नगरपरिषदेच्यावतीने शहरातील विविध विकास कामांबाबत निविदा प्रसिध्दीस देऊन मागविण्यात येत असून बर्याचवेळा निविदा कोणी भरत नसल्याकारणाने अनेक निविदा दोन ते पाचवेळा प्रसिध्द कराव्या लागतात. यामुळे विकासकामांची गती मंदावली असल्याने नगरपरिषद प्रशासन व सत्ताधारी नगरसेवकांमध्ये समन्वय नसल्याने एकच निविदा पुन्हा-पुन्हा प्रसिध्दीस द्यावी लागत असल्याने नागरीकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
निविदा का भरल्या जात नाहीत?
शिरूर शहरातील विविध भागातील विकासकामांबाबत निविदा मागविण्यात येत आहेत. या निविदा भरण्यास ठेकेदार धजावत नसल्याने एकाच कामाच्या दोन ते पाच वेळा निविदा प्रसिध्द कराव्या लागत असल्याने नागरीकांच्या पैशांचा अपव्यय होत आहे. यामुळे नगरपरिषद प्रशासन व सत्ताधार्याच्या कारभारावर नागरीक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशाप्रकारामुळे शहरातील विकासकामांची गतीही मंदावली आहे. ठराव होऊन संबंधीत कामाच्या निविदा मागविण्यात येत असतानाही निविदा भरण्यास कोणी येत नसल्याने विकास कामांची गती मंदावली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पुन्हा त्याच त्याच कामांच्या निविदा प्रसिध्द कराव्या लागत असल्याने व निविदा भरण्यास कोणी का धजावत नाही, याबाबत नगरपरिषद प्रशासन व सत्ताधारी यांच्यावर विचार करण्याची वेळ आली.
निविदा भरण्याचे आवाहन
नगरपरिषदेच्यावतीने विकासकामांच्या निविदा प्रसिध्द करून मागविण्यात येतात. परंतु, काही कामांच्या निविदा भरण्यास कोणी येत नसल्याने त्या निविदा पुन्हा मागविण्यात येतात. याबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करून उपाययोजना करण्यात येणार आहेत. शिरूर नगरपरिषदेच्यावतीने शहरातील विकासकामांबाबात मागवण्यात येणार्या निविदा भरण्याचे आवाहन नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी केले आहे.
रोषाला समोरे जावे लागेल
नगरपरिषद प्रशासन, सत्ताधारी व कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्यामुळे नगरपरिषदेच्यावतीने विकासकामांच्या मागविण्यात येणार्या निविदा भरण्यास कोणी धजावत नाही. त्यामुळे शहरातील विकासकामांची गती मंदावली आहे. याबाबत सत्ताधारी व प्रशासन यांच्यावर विचार करण्याची वेळ आली असून अशीच परिस्थिती राहिल्यास नागरीकांच्या रोषाला नगरपरिषदेस समोरे जावे लागेल.
– मंगेश खांडरे, विरोधी पक्षनेते, शिरूर नगरपरिषद