पिंपरी-चिंचवड : शहरात सुरू असलेल्या आणि सुरू होणार्या विविध विकासकामांच्या साहित्याचा दर्जा तपासण्यासाठी महापालिकेने ’सीईटीआरएस’ या संस्थेची नेमणूक केली आहे. त्याला बुधवारी (दि.10) स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.
महापालिकेतर्फे विविध विकासकामे करण्यात येतात. त्यासाठी विविध साहित्याची खरेदी केली जाते. साहित्याचा दर्जा तपासणे आवश्यक आहे. महापालिकेच्या विविध कामांचा दर्जा तपासण्यासाठी सध्या एनजीएम आणि आयआरएस या संस्था कार्यरत आहेत. स्थायी समितीच्या 4 ऑक्टोंबर 2017 रोजीच्या ठरावानुसार महापालिकेला विकासकामांचे साहित्य तपासणी करणार्या संस्थांनी एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोग शाळांना घेऊनच काम करणे आवश्यक आहे. त्यानुसार कन्स्ट्रक्शन एक्सलन्स टेस्टिंग अॅन्ड रिसर्च सर्विस (’सीईटीआरएस’) ही संस्था एनएबीएलकडून मान्यता प्राप्त आहे. यापुढे या संस्थेकडून महापालिकेच्या सर्व विकासकामांच्या साहित्याची तपासणी होईल.