विकासकामांच्या नामकरणासाठी प्रभागातील चारही नगरसेवकांची सहमती आवश्यक

0

पुणे । पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील विविध विभागात रस्ते, चौक, उड्डाणपूल, वाहनतळे, भुयारी मार्ग अशी विकासकामे केली जातात. या विकासकामांचे नामकरण करण्यासाठी प्रभागातील चार अथवा तीन नगरसेवकांची सहमती असणे आवश्यक ठरणार आहे. यासंदर्भात प्रभागातील नगरसेवकांचे एकमत न झाल्यास विकासकामाला नाव सुचविण्याचा अधिकार महापौरांना देण्यात आला आहे. महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महापालिकेच्या वतीने शहरात विविध विकासकामे करण्यात येतात. या विकासकामांना नाव देण्यासंदर्भात प्रभागातील नगरसेवकांकडून नाव समितीकडे प्रस्ताव देण्यात येत असे. त्यावर प्रशासनाचा अभिप्राय घेतल्यानंतर नाव समिती निर्णय घेत असे. यंदा महापालिकेच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने पार पडल्या आहेत. विकासकामांना नाव देताना प्रभागातील चारही नगरसेवकांचे मत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या प्रकल्पाला नाव द्यायचे झाल्यास चार अथवा कमीत कमी तीन नगरसेवकांचे एकमत असणे आवश्यक आहे, अन्यथा महापौर आपल्या अधिकारात नाव सुचविणार आहेत. यासंदर्भातील धोरण निश्चित करण्यात आले आहे.

नाव समितीचे धोरण
मागील पंचवार्षिकमध्ये महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या प्रकल्पांना काही नगरसेवकांनी आपल्या नातेवाईकांची नावे दिली होती. त्यावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे कान उपटले होते. त्यानंतर महापालिकेच्या वतीने नाव समितीचे धोरण तयार करण्यात आले. या समितीकडून विकासकामांना कोणते नाव द्यायचे याचा प्रस्ताव सादर करण्यात येतो.