पुणे । शहरात विकासकामे तसेच मोबाइल कंपन्यांच्या केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदाईमुळे रस्ते दुरूस्त करण्यासाठी जवळपास महिनाभराचा अवधी लागणार आहे. तर, पाणीपुरवठा, ड्रेनेज, पथ, विद्युतविभाग तसेच क्षेत्रिय कार्यालयांकडून सुरू असलेली खोदाईची कामे 15 मेपर्यंत पूर्ण करावीत. त्यानंतर 1 जूनपर्यंत रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण करावेत, असे आदेश पथ विभाग प्रभारी प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिले आहेत.
रस्ते खोदाई आणि दुरुस्ती कामांत खड्डे दुरुस्ती, खोदलेल्या रस्त्यांची कामे, दुभाजक दुरुस्ती, पदपथ जोड, चौकांमधील खड्डे बुजविणे यांचा समावेश आहे. याबाबत पावसकर यांनी नुकतीच संबधित विभागांची बैठक बोलाविली होती. या शिवाय, डांबरी रस्त्यांचे आवश्यकतेनुसार पुनर्डांबरीकरण, काँक्रिट रस्त्यांचे जाँईंटस भरणे, अॅटग्रेड ब्लॉक्सच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेशही पथ विभागाने दिले आहेत.
या कामांचे सर्वेक्षण करून त्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ही दिलेल्या मुदतीत पूर्ण करावीत, असे संबंधित विभागांना कळविले आहे. रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी मोठा कालावधी लागत असल्याने महापालिकेकडून दरवर्षी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची खोदाई 30 एप्रिलपूर्वीच बंद केली जाते. तर त्यात मोबाइल कंपन्यांसह पालिकेच्या खोदाईचाही समावेश असतो. मात्र, यावेळी पालिकेच्या कामासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
नालेसफाई वेळेत करण्याच्या सूचना
शहरातील सर्व मुख्य आणि अंतर्गत पावसाळी वाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या, नाले यांची साफसफाई संबंधित क्षेत्रिय कार्यालय करतात. ही कामे वेळत पूर्ण करावीत. या कामांसाठी अंदाजपत्रकीय तरतूद नसल्याने कामे वेळेत झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करावीत, असे आदेशही क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी नालेसफाईवरून भाजपला मोठ्या टीकेला सामोरे जावा लागले होते.