विकासकामांवरून भुसावळात भाजपाच्या आजी-माजी नगरसेवकांमध्ये रंगला कलगीतुरा

0

भुसावळ- शहर पालिकेची मंगळवारी सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी व अ‍ॅड.बोधराज चौधरी, माजी नगरसेवक वसंत पाटील यांच्यात प्रभागातील विकासकामांवरून चांगलीच शाब्दीक चकमक रंगल्याने शहरात दिवसभर या प्रकाराची चांगलीच खुमासदार चर्चा रंगली. उपस्थित नगरसेवकांनी वेळीच वाद मिटण्यासाठी सामंजस्याची भूमिका वठवल्याने अप्रिय घटना टळली.

बैठकीनंतरही रंगला वाद
शहरातील प्रभाग क्रमांक आठमधून प्रतिभा वसंत पाटील व युवराज लोणारी हे निवडून आले आहेत. नगरसेविका पती वसंत पाटील यांनी पालिकेच्या आवारात लोणारी यांना प्रभागातील विशिष्ट भागात मीच काम करेल, असे सांगितल्यानंतर उभयतांमध्ये चांगलाच वाद झाला. तत्पूर्वी अ‍ॅड.बोधराज चौधरी व लोणारी यांच्यातही या विषयावरून हमरी-तुमरी झाली तर हा वाद मिटल्यानंतर लोणारी व पाटील यांच्यातील वाद रंगला. आपण संपूर्ण प्रभागाचे नगरसेवक असल्याने व नागरीकांनी आपल्या निवडून दिले असल्याने कुठे विकासकामे करायची हा आपला अधिकार असल्याचे लोणारी यांनी सांगत त्याबाबत तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, शिवाय तुम्ही नगरसेवक नाही तर माजी नगरसेवक आहोत, असे सुनावल्याने वादात अधिक भर पडली. उपस्थित नगरसेवकांनी उभयंतांना बाजूला नेल्याने वाद शमला मात्र पालिकेच्या बैठकीनंतर मुख्याधिकार्‍यांच्या दालनानजीक याच विषयावर पुन्हा वाद रंगला तर यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे यांनी मध्यस्थी करीत वादावर पडदा टाकला.