पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या गावांकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले. मात्र भाजप सत्ता येताच समाविष्ट गावांचा कायापालट करण्यास सुरुवात करण्यात आली. यामुळे विरोधकांनी भ्रष्टाचाराचे खोटे-नाटे आरोप करायला सुरुवात केली आहे. आरोप करताना पुराव्याचा आधार असावा. विकासकामात कोणीही राजकारण आणू नये. विकासकामांमध्ये राजकारण आल्यास शहर प्रगतीपथावर जाणार नाही, असे आमदार लांडगे म्हणाले.
समाविष्ट गावांमधील पहिल्या टप्प्यातील 90 कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे रविवारी आमदार लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कामांमध्ये मोशी येथील गट क्रमांक 57 ते 61 पर्यंतचा 18 मीटर डीपी रस्ता, शिवाजीवाडी ते मोशी, मोशी आळंदी रस्ता ते इंद्रायणी नदी (केळगाव पुलापर्यंतचा) 18 डीपी रस्ता, डुडुळगाव, चर्होली पठारे मळा, डी. वाय. पाटील कॉलेज विकास आराखड्यातील 30 मीटर रुंदीच्या रस्त्याचे उर्वरित चर्होली मुख्य रस्ता, दाभाडे वस्ती ते इंद्रायणी नदीपर्यंतचा 45 मीटर रुंद रस्ता, पुणे आळंदी रस्ता ते दाभाडे वस्ती येथील 30 ते 45 मीटर डीपी रस्ता विकसित करणे, आझादनगर चर्होली या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, सारंग कामतेकर, भीमा फुगे नगरसेविका सुवर्णा बुर्डे, ई-क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
* रस्ते, उद्याने विकसित करणार!
आमदार महेश लांडगे पुढे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांवर 20 वर्षांपासून अन्याय होत होता. तो अन्याय दूर करण्याचा शब्द या परिसरातील नागरिकांना मी दिला होता. तो पाळला असून या भागात रस्त्यांची कामे सुरु होत आहेत. आगामी काळात पालिकेतील या समाविष्ट गावांत रस्ते, मुबलक पाणी, उड्डाण पूल, क्रीडांगणे, उद्याने विकसित करण्यावर माझा भर असणार आहे. समाविष्ट गावांचा विकास करुन गावांचा कायापालाट केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
* विकासासाठी सर्वाधिक निधी खर्च!
महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांकडे केवळ मतपेढी म्हणून पाहिले गेले. मी आमदार झाल्यापासून गेल्या तीन वर्षांत समाविष्ट गावातील विकासासाठी सर्वाधिक निधी खर्च केला आहे. महापालिका निवडणुकीत समाविष्ट गावातील नागरिक भाजपच्या पाठीमागे उभे राहिले. त्यांना आम्ही गावांच्या विकासाचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आम्ही शब्द पाळला आहे.
शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह आम्ही सर्वांनी समाविष्ट गावाचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे.
* आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य!
समाविष्ट गावात 425 कोटी रुपयांच्या खर्चाची कामे केली जाणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यातील 90 कोटींच्या कामांचे भूमिपूजन झाले. समाविष्ट गावांमधील अविकसित रस्ते आणि आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. विकासापासून वंचित असलेल्या समाविष्ट गावांमधील अविकसित रस्ते आणि आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आल्याचेही आमदार लांडगे म्हणाले.
* पक्षाचा विकासकामांचा अजेंडा!
आताच्या पाच वर्षाच्या कालावधीतील शहराचा विकास व मागील 20 वर्षांचा शहराचा विकास कसा झाला, हे नागरिकांनीच तपासून पहावे. कोणत्याही विषयात राजकारण न करता समाजाचे प्रश्न कसे सोडवता येतील याकडे लक्ष द्यायला हवे. समाविष्ट गावांचा विकास होऊन नागरिकीरण वाढेल. त्याचा नागरिकांना भरपूर फायदा होणार आहे. भाजपचा अजेंडा विकास कामांचा आहे. त्यानुसार पक्षाने विकास कामे सुरु केली आहेत, असेही आमदार लांडगे म्हणाले.
* आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य!
महापौर नितीन काळजे म्हणाले की, पालिकेतील समाविष्ट गावात 20 वर्षांपासून रस्ते झाले नव्हते. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्याने आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून समाविष्ट गावांचा विकास होत आहे. रस्ते झाल्यावर शेतकर्यांना मोठा फायदा होईल. समाविष्ट गावांमधील अविकसित रस्ते आणि आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. याचे सर्व श्रेय भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांचे आहे.