यापुढे समजून उमजून कामे करावी लागतील, श्रीवर्धन पंचायत समितीच्या अपयशाबाबत व्यक्त केली खंत
नदीकाठच्या रस्त्याला संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे लोकार्पण
अभय पाटील – बोर्ली। प्रत्येक गावागावांमध्ये १ कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला. भरडखोलमध्ये मच्छीमार बांधवांसाठी होड्या किनार्यास लागण्यासाठी व इतर कामांसाठी सुमारे ४ कोटी निधी उपलब्ध करून दिला. होड्यांसाठी डिझेल बंद झाले असताना ते मिळण्यासाठी माझ्या प्रयत्नामुळे भरडखोल मध्ये कोळी बांधवांना डिझेल चालू झाले. त्यानंतर कोंढे पंचतन १५० मते असणार्या गावासाठी सुमारे २ कोटी विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला. बोर्ली पंचतनसाठी अडीच कोटींची पाणीपुरवठा योजना दिली. परंतु, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपण मला माझ्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवलात. आम्ही केलेल्या विकासकामांची भावना आपल्या मनामध्ये नसेल, तर यापुढे समजून उमजून कामे करावी लागतील, असे निराशाजनक उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन तालुक्यातील कोंढेपंचतन येथे काढले. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १५ लक्ष खर्चून बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या संरक्षण भिंतीचे कामाचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
अच्छे दिनचे स्वप्न हवेत विरले
जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे श्रीवर्धनमध्ये कधी कोणी तोंडदेखील पाहिले का, असा प्रश्न केला, तर मागील लोकसभा निवडणुकीमध्ये अनंत गिते यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जप करून निवडून आले. परंतु साडेतीन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीमध्ये मोदी मोदी असा जप करून निवडून आल्यानंतर अच्छे दिनचे जनतेला दाखवलेले स्वप्न हवेत विरले, उलट गॅस सिलिंडरची दरवाढ करत महिलांचा कसला सन्मान केंद्र सरकार करते यावर टीका केली.
श्रीवर्धन तालुक्यातील कोंढेपंचतन ते बोर्ली पंचतन नदी काठच्या रस्त्याला संरक्षक भिंतीचे बांधकाम जिल्हा वार्षिक योजना २०१४-१५ अंतर्गत १५ लक्ष रुपये निधीचे कामाचे लोकार्पण सोहळा ग्रामस्थ मंडळ कोंढेपंचतन यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर, महमद मेमन तालुकाध्यक्ष दर्षन विचारे, युवकाध्यक्ष सिद्धेश कोसबे, माजी सभापती स्वाती पाटील, लाला जोषी, तालुका उपाध्यक्ष सुचिन किर, बबन सुर्वे, बोर्ली पंचतन सरपंच गणेश पाटील, उपसरपंच अनंत पयेर, शिस्ते सरपंच रमेश घरत, दिवेयागर माजी सरपंच उदय बापट, ग्रा. पं. सदस्य मंदार तोडणकर, पोलीस पाटील उद्देश वागजे, यशवंत काते, शशिकांत परकर, सुजित पाटील, अमित खोत, बबन खेडेकर, दीपक खेडेकर, प्रकाश खेडेकर, संतोष खेडेकर, अंकुश खेडेकर, जगदीष खेडेकर, प्रकाष तोंडलेकर, तसेच इतर मान्यवर व ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होते. यावेळी आपल्या मार्गदर्शन मनोगतामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, विकासकामे हीच जात व धर्म आहे सत्ता नसतानादेखील विकासकामांसाठी निधी खेचून आणण्याची धमक आमच्या मनगटामध्ये आहे. २००९ पूर्वी २५ वर्षांमध्ये आलेला निधी आणि २००९ नंतर आलेला निधी याची आकडेवारी पाहिली तर निश्चितच आपण केलेल्या विकासकामांची आकडेवारी कितीतरी पटीने जास्त आहे.