पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – ‘स्थायी समितीत ठराव मंजूर झाला, की ठेकेदाराला कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) दिल्याच पाहिजेत. ’सोम्या-गोम्या’ उठतो आणि वर्क ऑर्डर द्यायची नाही असे सांगतो. आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांचे ऐकतात आणि कामे थांबवितात आयुक्तांना काहीही विचारले की ते निव्वळ भाषण देतात’, असा आरोप स्थायी समिती अध्यक्षांनी केला होता. मग ही विकास कामे थांबविणारे सोम्या-गोम्या कोण आहेत, त्यांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. याबाबत स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांना पत्र दिले आहे.
शहरवासियांना नावे कळू देत
पत्रात म्हटले आहे की, स्थायी समितीच्या बैठकीत आपण स्थायी समितीत ठराव मंजूर झाला की ठेकेदाराला कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) दिल्याच पाहिजे. ’सोम्या-गोम्या’ उठातो आणि वर्क ऑर्डर द्यायची नाही असे सांगतो. आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांचे ऐकतात आणि कामे थांबवितात. आयुक्तांना काहीही विचारले की ते निव्वळ भाषण देतात, असा आपण आरोप केला होता. हितसंबंध गुंतलेली मंडळी, त्यांचे विविध ‘गॉडफादर’ या विदारक परिस्थितीत अडथळ्यांची शर्यत कशी पार पडायची? लोकांना काय उत्तरे द्यायची? असा संताप व्यक्त करीत अंदाधुंद कारभार कदापी सहन करणार नाही, असे आपण त्या बैठकीत ठणकाविले होते. परंतु, विकासकामे अडविणारे सोम्या-गोम्या कोण आहेत. याची माहिती शहरवासियांना होणे गरजेचे आहे. त्यामुळे विकासकामे अडविणार्या त्या सोम्या-गोम्यांची नावे जाहीर करावीत.