विकासदराबरोबर स्वच्छ शहरांचीनिर्मितीही महत्त्वाची – मुख्यमंत्री

0

मुंबई – राज्याचा विकास दर हा शहरांच्या विकासावर अवलंबून असल्याने तो अधिकाधिक वाढण्यासाठी नागरीकांना चांगले राहणीमान व गुणवत्तापूर्ण जीवन देण्यासाठी स्वच्छ शहरांची निर्मिती होणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

अमृत व नगरोत्थान अभियानातंर्गत राज्यातील 28 शहरांमध्ये 1 हजार 622 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा ई-भूमिपुजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वर्षा निवासस्थानी संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार सदाशिव मंडलीक, आमदार सुनील तटकरे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उंच इमारती, सुंदर रस्ते व बगीचे म्हणजे शहरांचा विकास नसून नागरिकांना शाश्‍वत पिण्याचे पाणी, मलनि:स्सारणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करणे, सांडपाण्याचा पुनर्वापर करुन शहरांमध्ये हरितपट्टे तयार केल्यास शहरांचा विकास होईल. शहरांच्या विकासावरच राज्याचा विकास दर अवलंबून असल्याने शहरांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीच्या माध्यमातून राज्यात मोठया प्रमाणात विकासाची कामे होत आहेत.

शहरांतील बांधकामंचे नकाशे डिजीटलाईज
स्वच्छ, सुंदर व स्मार्ट शहरांच्या निर्मितीसाठी शहरांचा विकास आराखडा महत्वाचा असतो. यासाठी विकास आराखड्याला महत्व देण्यात आले आहे. शहरांचा नियोजनबध्द विकास होण्यासाठी यापुढे शहरांतील बांधकामांचे नकाशे डिजिटल पध्दतीने मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शहरांमधील कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण होण्यासाठी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. कामांची गुणवत्ता न राखल्यास संबंधितांवर कारवाई करण्यास शासन मागेपुढे पाहणार नाही. त्याचबरोबर उत्तम शहरे निर्माण व्हावीत यासाठी निवड स्पर्धा सुरु करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शहरांच्या विकासाला चालना देण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण कामे होण्यास मदत होणार आहे.

नागरिकांना सर्व सेवा ऑनलाईन देण्यासाठी ई- पोर्टल तयार करण्यात येत आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना त्यांना आवश्यक असलेल्या सेवा ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. तसेच नगरपालिकांनी नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील 100 शहरे संपूर्ण हागणदारीमुक्त झाली आहे. येत्या ऑक्टोबर 2017 पर्यंत राज्यातील संपूर्ण शहरे हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे. देशातील स्वच्छ शहरांमध्ये सर्वाधिक स्वच्छ शहरे महाराष्ट्रातील आहेत. त्याचबरोबर, सर्वाधिक 7 स्मार्ट शहरे असणारे देशातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.