नवी दिल्ली: सद्यस्थितीला भारताची अर्थव्यवस्था २.७ अब्ज डॉलर्सची आहे. पुढील पाच वर्षात अर्थव्यवस्था ५ अब्ज डॉलर्स होईल असा दावा केला जातो आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी वार्षिक नऊ टक्के दराने विकास होण्याची आवश्यकता आहे. अशातच २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ अब्ज डॉलर्स होणे अशक्य असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी.रंगराजन यांनी व्यक्त केले.
यावर्षी विकासदर सहा टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी विकासदर सात टक्क्यांपर्यंत जाईल. त्यानंतर आपल्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असे रंगराजन यांनी सांगितले आहे. देशाचा जीडीपी ५ हजार अब्ज डॉलर्स राहिला तर आपले दरडोई उत्पन्न १ हजार ८०० डॉलर्सवरून ३ हजार ६०० डॉलर्स म्हणजेच दुप्पट होईल. यानंतर भारत विकसित देश न होता निम्न मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या यादीत राहिल. ज्या देशातील दरडोई उत्पन्न हे १२ हजार डॉलर्स असते तो देश विकसित देश म्हणून ओळखला जातो, असंही त्यांनी नमूद केले. भारताने पुढील २२ वर्षे सातत्याने ९ टक्क्यांनी विकासदर गाठला तर तो पल्ला पार करणे शक्य असल्याचे रंगराजन म्हणाले.