शिवाजी विद्यालयाने राबविला उपक्रम
देहूरोड- देहूरोड परिसरातील विविध शाळांमध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बालचमूंच्या दिंड्या आणि पालखी सोहळयांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यांमध्ये बालचमू अक्षरशः तल्लीन झाल्याचे चित्र होते. येथील श्री शिवाजी विद्यालयातील शिशुवर्ग ते चौथीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांची बालदिंडी काढण्यात आली होती. वारकरी सांप्रदायाच्या पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते. शाळेच्या प्रांगणातून हि दिंडी काढण्यात आली. त्यानंतर मैदानाच्या मध्यभागी रिंगण सोहळा पार पडला. दोन चिमुरड्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केली होती. त्यांच्यापुढे भजन, किर्तन करण्यात आले. श्री शिवाजी विद्यालयातील शिक्षिका प्रिया बोरकर, संघमित्रा रसाळ, राजश्री कराळे, गुलशन शेख, संगिता भोसले, मनोज मेदनकर, अलका ठाकरे, अक्षय गायकवाड आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.
विद्यालय राबविते वेगवेगळे उपक्रम
यावेळी मुख्याध्यापिका धनश्री जाधव यांनी सांगितले की, लहान मुलांना दिंडी, वारकरी, आपली संत मंडळी आदी गोष्टी माहित नसतात. त्यांना या दिंडीच्या माध्यमातून त्यांना संतांबद्दल, आपल्या वारकरी सांपद्रायाबद्दल माहिती होणे गरजेचे आहे. यावयात त्यांच्यावर संस्कार होणे गरजेचे असतात. त्यामुळे विद्यालयाच्यावतीने असे विविध उपक्रम राबविले जातात. दिंडी उपक्रम राबविण्यासाठी शाळेचे शिक्षक, पालक यांचे सहकार्य लाभले. विकासनगर येथे किडस् वर्ल्ड या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने बालदिंडी काढली होती. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते. तुळशी वृंदावन घेतलेल्या छोट्या विद्यार्थिनी, तसेच संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वेशभूषेत आणि छोटी विणा, टाळ घेऊन वारकर्यांच्या वेशात सहभागी झालेले विद्यार्थी लक्ष वेधुन घेत होते. येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात या दिंडीची सांगता झाली. शाळेचे संचालक दिनेश चिगटे, मुख्याध्यापिका सुनिता चिगटे, नगरसेविका प्रज्ञा खानोलकर या दिंडीत सहभागी झाले होते. वृक्ष लावा-वृक्ष जगवा असा संदेश यावेळी देण्यात आला.