महापालिकेचे होत आहे सपशेल दुर्लक्ष
देहूरोड : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणार्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून रावेत, किवळे, मामुर्डी या समाविष्ट गावांकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. या दिवाळीत विकासनगर, किवळे, मामुर्डी परिसरातील सोसायट्यांचा कचरा मोठ्या प्रमाणात थेट रस्त्यावरच टाकण्यात आला असून तो उचलण्यासाठी काहीच हालचाली दिसून येत नसल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या किवळे, रावेत, मामुर्डी परिसराचा मागील दोन दशकात कायापालट झाला आहे. या परिसरात सोन्याच्या भावाने जमीनी विकल्या गेल्या. पुर्वीची हिरवीगार शेती नाहीशी झाली. त्याजागी आता टोलेजंग इमारतींनी घेतली. ग्रामीण बाज हरवून शहरीकरण झालेल्या या भागात कचर्याची समस्या मात्र, प्रचंड प्रमाणात वाढली. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना, झपाट्याने शहरीकरण झालेल्या या भागाकडे पालिकेचे मात्र सपशेल दुर्लक्ष झाले आहेत.
परिसरात कचराकुंड्या नाही
रावेत, भोंडवे कॉर्नर, पुणे-बंगळुरू महामार्गावरील डझनभर हॉटेल्स, विकासनगर, आदर्शनगर, किवळे आणि मामुर्डी या भागात उभ्या राहिलेल्या सोसायट्यांचा कचरा व सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकडे म्हणावे तसे लक्ष देण्यात आले नाही. विशेषतः सोसायट्यांच्या परिसरात कचरकुंड्याच नसल्यामुळे कचर्याची समस्या बिकट झाली आहे, परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विकासनगर भागातील सरपंच वस्तीजवळचा ओढा (सध्याचा नाला), पेंडसे कॉलनी, शांती निवास जवळ आणि कात्रज बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्ता या भागात रस्त्यावरच कचर्याचे ढिगारे साठले आहेत. यापैकी प्रत्येक कचर्याच्या ढिगार्याने किमान एक टेंपो भरेल, अशी अवस्था आहे. या कचर्यामुळे आजुबाजुला राहणार्या नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित सोसायटयांकडे तक्रार करण्याची सोय राहिली नाही, असे नागरिक सांगतात. तर संबंधित बिल्डरसह पालिकेच्या आरोग्य विभागाला या प्रकारासाठी जबाबदार धरणयत यावे, अशी मागणी केली जात आहे.
कचरा ओढ्यातून नदीमध्ये
अनेक दिवस कचरा उचलला जात नसल्यामुळे कात्रज बाह्यवळण मार्गाच्या सेवारस्त्यावरील कचरा शेजारून वाहणार्या ओढ्यात मिसळत आहे. हा ओढा पुढे पवना नदीला मिळत असल्यामुळे हे दुषीत आणि कचरायुक्त पाणी थेट पवना नदीत मिसळत असल्याचे समोर आले आहे. नदी प्रदूषणाला जबाबदार धरून संबंधितांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी अशी ज्येष्ठ नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे. या भागात वर्षानुवर्षे हि परिस्थिती कायम असून स्थानिक नगरसेवक आणि पालिकेचे कर्मचारी जाणीवपूर्वक अशा बाबींकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.