मुंबई । नक्षलवादी जिथे वारंवार रक्ताची होळी खेळत आहेत तो दक्षिण बस्तरमधील विभाग लाल आतंकवादाचा बालेकिल्ला आहे. हा सर्व विभाग म्हणजे 900 ते 1000 किलोमीटरचे घनदाट जंगल आहे. या विभागाचे मुख्यालय जगरगुंडा आहे. या जगरगुंडाला तिन्ही बाजूंनी घेरता यावे म्हणून तीन निरनिराळ्या ठिकाणाहून रस्ते बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील पहिला रस्ता, दोरनापाल ते जगरगुंडा हा 60 किलोमीटर अंतराचा आहे. याच मार्गावर सुरक्षादलांवर सर्वात जास्त हल्ले होत आहेत. याशिवाय विजापूरहून आणि दंतेवाडा येथील अरनपुरमधून रस्ते तयार होत आहेत. दोरनापाल ते जगरगुंडा रस्त्याचे काम हे सर्वात जास्त आव्हानकारक आहे. सीआरपीएफच्या निगराणीखाली या रस्त्यांचे काम चालू असल्यामुळे नक्षलवादी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ले करत आहे. या रस्त्यांमुळे शाळा, रुग्णालये आणि इतर शासकीय सुविधा उपलब्ध झाल्यावर आपला प्रभाव कमी होईल, अशी भीती नक्षलवाद्यांना वाटत आहे. त्यामुळे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करून रस्ते बनवण्याच्या कामात वारंवार अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांचा असतो.
पक्का रस्ता करण्यासाठी काढल्या 18 वेळा निविदा
दोरनापाल ते जगरगुंडा हा रस्ता गेली 17 वर्षे नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे. या मार्गावर पक्का रस्ता बनवण्याचा निर्णय झाल्यावर तब्बल 18 वेळा या कामासाठी निविदा काढण्यात आल्या. याठिकाणी काम करण्यास कुठलाच कंत्राटदार तयार झाला नाही. शेवटी छत्तीसगड राज्याच्या पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनला हा रस्ता बनवण्याचे काम देण्यात आले. त्यामुळे सिमेंट, वाळू, दगड यांच्याजोडीने जवानांच्या रक्ताने हा रस्ता तयार होतोय, असे म्हटल्यास अतिशययोक्ती ठरणार नाही. हा रस्ता तयार करण्यासाठी सीआरपीएफने बुर्कापाल येथे आपला तळ तयार केला आहे. सोमवारी सीआरपीएफचे जवान नेहमीप्रमाणे रोड ओपनिंग, म्हणजे रस्त्याचे काम सुरळीतपणे चालू रहावे, नक्षलवाद्यांनी त्यात अडथळे निर्माण करू नयेत, त्यांनी भुसुरुंग पेरू नयेत, याकरता निघाले होते. रोड ओपनिंग करत असताना या जवानांची महिला आणि आदिवासींकडून रेकी करण्यात आली. त्यानंतर जेवल्यानंतर विश्रांती घेत असताना सीआरपीएफच्या जवानांवर जिवघेणा हल्ला करण्यात आला.
नक्षलवादाची पाच दशके
1967 मध्ये पश्चिम बंगालच्या नक्षलवाडीमध्ये उडालेल्या एक छोट्या ठिणगीने आता वडवानलाचे स्वरुप घेतले आहे. हा वडवानल आता देशातील 22 जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. नक्षलवादाला आता 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 22 राज्यातील किमान 223 जिल्ह्यांमध्ये कुठल्या ना कुठल्यातरी नक्षलवादी गटांचा प्रभाव आहे. देशाच्या क्षेत्रफळाचा विचार करता किमान 40 टक्के प्रदेशावर नक्षलवादाचा प्रभाव आहे. नक्षलवाद्यांच्या परवानगीशिवाय तिथे विकासाचे कुठलेच काम होत नाही. खरी परिस्थिती अशी आहे की, सुरक्षादलांचे जवानही या विभागांमध्ये जायची हिंमत करत नाहीत.
तीर बॉम्बचा वापर
सीआरपीएफच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी रॉकटे लाँचर, बॉम्ब आणि स्थानिक पातळीवर तयार केला जाणारा तीर (बाण) बॉम्बचा जास्त वापर केला. खास पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या तीर बॉम्बमुळेही खूप नुकसान झाले. या तीर बॉम्बच्या पुढच्या टोकात दारू भरलेली असते. या तीर बॉम्बने 100 ते 150 मीटर अंतरापर्यंत निशाणा साधता येतो. सोमवारी केलेल्या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी 100 पेक्षा जास्त तीत बॉम्बचा वापर केला पण त्यातील 1 डझन तीर बॉम्ब फुटलेच नाही. 4 मार्च 2015 रोजी करण्यात आलेल्या शोधमोहिमे दरम्यान पहिल्यांदाच अशा प्रकारचे 19 तीर बॉम्ब मिळाले होते. यावेळी या बॉम्बचा जास्त वापर केला गेला.
ती महिला कोण?
रोड ओपनींगसाठी सीआरपीएफचे जवान जात असताना जंगलातील एका भागातून एक महिला जोरजोराने ओरडत त्या जवानांजवळ आली. रस्त्याच्या दुसर्या बाजूला इशारा करत त्या ठिकाणी काही लोक असून ते आपल्यावर जबरदस्ती करत असल्याचे त्या महिलेने जवानांना सांगितले. त्या महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून काही जवानांनी रस्त्याच्या दुसर्या बाजूला असलेल्या लोकांच्या दिशेने कूच केले. यादरम्यान त्या महिलाने एका जवानाची रायफल वेगाने जमिनीच्या दिशेने झुकवली. रस्त्याच्या दुसर्या बाजूला तयारीत बसलेल्या नक्षलवाद्यांनी जोरदार गोळीबार करण्यास सुरुवात केली. या दरम्यान नक्षलवाद्यांनी तीन जवानांवर धारदार शस्त्रांनी वार केले. त्यातून या जवानांना सावरण्याची संधी न देताच नक्षलवाद्यांनी त्यांच्या शरीराच्या चिंधड्या उडवल्या. जवानांकडे धावत आलेली ती 20 ते 25 वर्षांची महिला नक्षलवादी नसून सामान्य महिला असल्याचा अंदाज सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकार्यांनी काढला आहे. याशिवाय रोड ओपनींग दरम्यान कुठल्याही पीडित व्यक्तिवर थेट विश्वास न ठेवण्याचा सल्ला जवानांना देण्यात आला आहे. बस्तरमधील सुकमा, दंतेवाडा, विजापूर आणि नारायणपूर विभागात सीआरपीएफचे जवान तैनात आहे. तर नक्षलवाद्यांचा विशेष प्रभाव असलेल्या भागात बीएसएफ, आटीबीपी आणि सीआयएसएफचे जवान बंदोबस्ताचे काम करतात.
– देशभरात सीआरपीएफच्या जवानांवर आणि त्यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी केलेले हल्ले
16 जुलै 2008 – ओरिसातील मलकंगिरी जिल्ह्यात सुरुंग स्फोटात पोलीस व्हॅन उडविली, 21 पोलीस मृत्युमुखी.
29 जून 2008 – नक्षलविरोधी पथक नौकेवर ओरिसातील बालिमेला सरोवरात हल्ला, 28 जवान ठार.
8 ऑक्टोबर 2009 – महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातील लहेरी पोलीस ठाण्यावर हल्ला, 17 पोलीस ठार.
30 सप्टेंबर 2009 – महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातील कोरची आणि बेलगाव ग्रामपंचायतीची कार्यालये नक्षलवाद्यांनी पेटवून दिली.
26 सप्टेंबर 2009 – छत्तीसगडच्या जगदलपूरमधील पैरागुडा गावात नक्षलवाद्यांनी भाजपचे बालाघाट येथील खासदार बळिराम कश्यप यांच्या मुलाची हत्या केली.
4 सप्टेंबर 2009 – छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात आदेड गावात चार गावकर्यांची हत्या.
31 जुलै 2009 – छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात विशेष पोलीस अधिकारी आणि आणखी एकाची हत्या.
27 जुलै 2009 – छत्तीसगडमधील दांतेवाडा जिल्ह्यात भूसुरुंगाच्या स्फोटात सहा जण ठार.
23 जून 2009 – बिहारमधील लखिसराई जिल्ह्यात न्यायालयाच्या आवारात नक्षलवाद्यांनी गोळीबार करून चार साथीदारांची सुटका केली.
16 जून 2009 – पालामाऊ जिल्ह्यातील बेहेराखंड येथे नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या सुरुंगाच्या स्फोटात 11 पोलीस अधिकारी ठार, दुसर्या घटनेत माओवाद्यांच्या हल्ल्यात चार पोलीस ठार.
13 जून 2009 – बोकारोजवळील गावात घडवून आणलेल्या दोन स्फोटांत दहा पोलीस ठार, अनेक जखमी.
10 जून 2009 – झारखंडमधील सारंदा जंगलाच्या परिसरात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दहा पोलीस ठार.
22 मे 2009 – महाराष्ट्रात गडचिरोली जवळील जंगलात माओवाद्यांच्या हल्ल्यात 16 पोलीस ठार.
22 एप्रिल 2009 – सुमारे 300 प्रवासी असलेल्या रेल्वेगाडीचे माओवाद्यांकडून अपहरण, नंतर सर्वांची सुटका.
13 एप्रिल 2009 – ओरिसातील कोरापुट जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात निमलष्करी दलाचे 10 जवान ठार.
15 फेब्रुवारी 2010 – पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात लष्कराच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात इस्टर्न फ्रंटियर रायफल्सचे 24 जवान ठार.
4 फेब्रुवारी 2010 – ओरिसातील कोरापुट जिल्ह्यात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या सुरुंगाच्या स्फोटात 11 जवान ठार.
8 मे 2010 – छत्तीसगडमधील बिजापूर येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावरील हल्ल्यात 8 जण मृत्युमुखी.
29 जून 2010 – छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 26 जवान मृत्युमुखी.
18 ऑक्टोबर 2012 – गया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 6 सीआरपीएफचे जवान मृत्युमुखी.
25 मे 2013 – छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्यात महेंद्र कर्मा या काँग्रेसच्या नेत्यासह पक्षाचे 25 जण ठार.
11 मार्च 2014 – छत्तीसगडमधील सुकामा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 15 सुरक्षारक्षक ठार.
12 मार्च 2017 – छत्तीसगडमधील सुकामा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 12 जवान मृत्युमुखी.
24 एप्रिल 2017 – छत्तीसगडमधील सुकामा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 26 जवान मृत्युमुखी.