विकासाची दिशा मिळाल्याने पुर्वांचल बदलतोय

0

पिंपरी-चिंचवड :  भौगोलिक, सामाजिक परिस्थिती चांगली असताना सुजलाम-सुफलाम असलेल्या पुर्वांचल राज्ये राजकीय स्वार्थामुळे विकासापासून दूर होते. तेथील गरिब जनतेमध्ये आशावाद निर्माण करून भारतीय जनता पक्षाने काम सुरू केले. रस्ते, रेल्वेचे जाळे वाढविले असून पर्यटन विकासाला चालना देण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्यामुळे विकासाची दिशा मिळाल्याने पुर्वांचल खर्‍या अर्थाने बदलतोय’’, असे मत भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व त्रिपुरा राज्याचे प्रभारी सुनील देवधर यांनी मांडले.

पाच मे पर्यंत व्याख्यानमाला
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 1 ते 5 मे या कालावधीत आयोजित 34 व्या छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेचे उद्घाटन सोमवारी महाराष्ट्र दिनी झाले. त्यावेळी पहिले पुष्प ‘बदलते पूर्वांचल’ या विषयावर देवधर यांनी गुंफले. या प्रसंगी सावरकर मंडळाचे अध्यक्ष एस. बी. पाटील, उपाध्यक्ष सदाशिव रिकामे, कार्याध्यक्ष विनोद बंन्सल, सचिव भास्कर रिकामे आदी उपस्थित होते.

ईशान्य भारतात नैसर्गिक विविधता
देवधर म्हणाले, “पुर्वाचल म्हणजेच ईशान्य भारत हा नैसर्गिक विविधतेने समुध्द आहे. भारताचा पहिला सुर्यकिरण अरुणाचल प्रदेशच्या डोंग येथे पडतो. भारताचा 95 टक्के चहा आसाममध्ये होतो. संपुर्ण भारताला झाडू मेघायल पुरवतो. सर्व राज्यांना पुरून उरेल इतकी जलविद्युत निर्मिती क्षमता आहे. मेघालयात कोळसा, हळद, आसाममध्ये खनिज तेल, त्रिपुराची संत्री, लिची, नासपती, किवी फळे प्रसिध्द आहेत. 70 प्रकारचे बांबू इथे वाढतात.

आशियातील सर्वात स्वच्छ गाव मारलेनगाव बघण्यास आंतराष्ट्रीय पर्यटक येतात. वनसंपत्ती, प्राणी, पक्षी असल्याने भरपूर जैवविविधता आहे. तर, सामाजिक विविधताही पुर्वाचलमध्ये असून 200 जाती असून सर्वांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत. सर्वांचे उपरणे वेगळे असले, परंतु त्यांच्या विविधतेही एकात्मता दिसते.’’

विकासाचा अभाव, 67 टक्के दारिद्रय
“भौगोलिक, सामाजिक परिस्थिती चांगली असून विकासाचा अभाव आहे. त्रिपुरात 67 टक्के लोक दारिद्ररेषेखाली आहेत. आतापर्यंत राजकीय स्वार्थापायी तेथील लोकांना गरिबी, दारिद्र्यात ठेवण्याला प्राधान्य दिले गेले. प्रगती झाल्यास त्यांचे महत्त्व कमी होईल, ही भिती त्यांना वाटत असावी. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी तेथे तळागाळापर्यंत काम करून लोकांमध्ये आशावाद निर्माण केला. माओवाद्यांनी 150 गाड्या, 250 हून अधिक डोकी फोडली. अनेकांनी त्यात बलिदान दिले. परंतु, तरीही भारतीयांशी त्यांची मने जुळविण्याचे काम संघाच्या लोकांनी सातत्याने सुरू ठेवले. धमक्या येत असताना संघाच्या शाखा लावल्या. जुलमी राजवट संपवू व एकमुखी सरकार देऊ हा विश्‍वास या परिस्थितीत देखील निर्माण केला’’, असेही ते म्हणाले.

भाजप सरकारमुळे विकासगंगा
पुर्वी रस्त्यात सर्वत्र लाल झेंडे होते. आता एकही रस्ता नाही, जिथे भाजपचा झेंडा नाही. आता भाजप सरकार दिलेली आश्‍वासने पुर्ण करत असून गरिबी, दारिद्र्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. मुख्यमंत्री 18 तास काम करत आहेत. सातवा वेतन आयोग लागू केला. सातही राज्यात केंद्र सरकारच्या प्रयत्नातून रेल्वे पोहचली आहे.

ब्रम्हपुत्रेवर सर्वात लांब पुल सुरू केला. हजारो किमी रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम सरकार करीत आहेत. त्रिपुरात सर्वत्र शुध्दपाणी देण्याची योजना चालू आहे. पर्यटन विकासाचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. पुर्वेकडील राज्यातील लोकांशी मैत्री करा आणि त्यांना प्रेम द्या, असे आवाहन देवधर यांनी शेवटी केले. विवेक जोशी यांनी परिचय करून दिला. भास्कर रिकामे यांनी सूत्रसंचालन केले.