हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे सुत्र आयुष्यभर जपून सामान्य शिवसैनिक ते आमदार-उपनेते पद आणि आता राज्यमंत्री पदापर्यंत पोहचलेले, खान्देशचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे असे ना. गुलाबराव पाटील यांचा आज वाढदिवस. नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व ही गुणवैशिष्टये एकवटलेला खान्देशचा नेता म्हणजे गुलाबराव पाटील. ते ज्यावेळी व्यासपिठावरुन बोलायला सुरवात करतात तेव्हा त्यांच्यातला सामान्य शिवसैनिक पोटतिडकिनं भडभडून बोलतो . ही तोफ जेव्हा धडधडते तेव्हा भल्याभल्यांना घाम फुटतो. त्यात राजकीय विरोधक असोत अथवा मुजोर, निर्ढावलेले शासकीय अधिकारी असोत यांची दमछाक होते.
खान्देशचा शेतकरी हा सातत्याने संकटात दिसतो. निसर्ग, शासन आणि परिस्थिती यांच्या जात्यात भरडले जाणार्या बळीराजाचा आवाज म्हणूनही ते वेळोवेळी समोर आले आहेत. बोलेन तर खरी वाणी आणि आयुष्यभर जगेल तर फक्त वाघावाणी हा त्यांचा संकल्प आहे.
सध्या शिवसेना पक्ष सरकारमध्ये व भाऊ राज्याचे मंत्री आहेत. यामूळे त्यांच्यावर साधनसूचितेचे अप्रत्यक्ष दडपण आहेच. मात्र, त्यास न जुमानता त्यांच्यातला खंदा शिवसैनिक वेळोवेळी जागा होता आणि आपल्याच सरकारच्या विरोधात उभं राहायलाही मागे पुढे पहात नाही. ते थेट आवाज उठवतात व जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडतात. तीन वेळा आमदार, उपनेता आणि आता मंत्री होवूनही पदाची गुर्मी अंगात येवू न देणे ही कसरतच भाऊंनी सहज साध्य केली आहे. भाऊंचा मूळ पिंड तसा राजकारणाचा नाही. उमदा स्वभाव, धाडसी वृत्ती आणि झोकून देण्याची तयारी यामुळे त्यांच्या सभोवती प्रारंभापासूच तरुणांची फौजच जमा व्हायला लागली. सामान्यांच्या समस्यांना भिडून निस्तारण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नातून त्यांची विश्वासार्हता वाढली आणि जनतेने त्यांना आमदार म्हणून निवडून दिले. पिढिजात राजकारणाची पार्श्वभूमी नसतांना त्यांनी मिळवलेले यश लक्षवेधी होते. त्याची दखल स्वतः बाळासाहेबांनी घेतली व सामान्यांचा गुलाबभाऊ शिवसेनेचा ढाण्या वाघ बनला. आमदार व मंत्री झाल्यावरही ते शिवसैनिकांशी जुळून राहिले. सामान्य माणसाला पानटपरीवरही भेटू लागले. गार्हाणी ऐकू लागले. यातूनच टपरीवरचा आमदार असा लौकीक त्यांना लाभला. शेतकर्यांच्या अडचणी जाणून त्यावर वाझोंटी चर्चा न करता हातात रुमणंच घेत थेट आंदोलन करणं ही भाऊंची खासियत आहे. पुर्वीच्या युती सरकारच्या काळात व आता मंत्री असतानाही ते शेतकर्यासाठी रस्त्यावर उतरतात यातूनच त्यांची तळमळ दिसून येते. खरंतर भाऊंसारख्या ढाण्या वाघाला मंत्रीपद हे वेसण घालण्यासारखेच आहे. यामुळे त्यांच्या स्वयंभू धाडसी व्यक्तीमत्वाला आवर बसला आहे.
शासन आणि जनता यांच्यातले झारीचे शुक्राचार्य म्हणजे काही शासकीय अधिकारी. अनेक चांगल्या योजना या अधिकार्यांच्या स्वार्थीपणामुळे जनतेपर्यंत पोहचत नाहीत. अशा अधिकार्यांना भाऊ धारेवर धरतात. एखाद्याच्या कानफटीत द्यायलाही मागेपुढे पाहात नाहीत. यामुळे त्यांच्यावर अनेक केसेसही दाखल झाल्यात मात्र, हीच माझ्या कामाची पावती असं ते म्हणतात. देशात मोदी लाट असतांना आणि त्यांच्या विरोधात स्वतः मोदी प्रचाराला येवूनही त्यांचा पराभव झाला नाही ही त्यांच्या कारकिर्दीची सर्वात मोठी विजयश्री होती. अनेकदा मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी देणं ही शोकांतिका होती तरी ती वस्तूस्थिती आहे हे कुणी नाकारु शकत नाही. याची बोच खान्देशातील प्रत्येक शिवसैनिकाला होती. समाजाच्या अपेक्षांची नाळ पक्की ओळखणारा हा नेता नेहमी सरकारी धोरणे लवचिक असावी व प्रशासन लोकाभिमुख असावे असा आग्रह धरतो. केवळ नियमांच्या झापडबंद कारभारात सामान्य माणूस छळला जाऊ नये या मुद्यावर त्यांचा नेहमी तात्विक संताप अनेक वरिष्ठ अधिकार्यांनी जवळून अनुभवला आहे. प्रशासन लोकाभिमुख ठेवायचे असेल तर घड्याळाकडे न पाहता काम करणार्या अधिकारी व कर्मचार्यांची गरज असते आणि बर्याच प्रमाणात प्रशासनात या विचाराचा अभाव दिसतो म्हणून गुलाबराव पाटील यांचे वरिष्ठ अधिकार्यांशीही खटके उडाले आहेत. एखाद्या योजनेचा आवाका मोठा असेल तर लाभार्थ्यांच्या सर्वच दृष्टीने आवाक्याचा विचार करुन प्रशासनाने त्या योजनेच्या यशासाठी राबले पाहिजे, असा आग्रह त्यांनी अजूनही सोडलेला नाही. गुलाबराव पाटील यांच्या या भूमिकेला बळ देणारे त्यांचे चाहते राज्यभरातून त्यांनी तयार केलेले आहेत. या समविचारी मंडळींमुळे सध्या राज्याच्या मंत्रीमंडळातील हा मंत्री लोकाभिमुख प्रशासनाच्या बाबतीत खास दक्षता घेणार्या निवडक नेत्यांमध्ये मोजला जातो. त्यांच्या या कार्यशैलीचा प्रभाव या विचारांचा आदर करणार्या अधिकार्यांवरही दिसून येतो. त्यांच्या हातून मतदारसंघात विविध विकास कामे होवोत हीच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.
विश्वनाथ पाटील – 9158033321