विकासाची सीडी दाखवा, सेक्सची नको!

0

हार्दिक पटेलचा भाजपवर पलटवार

अहमदाबाद : गुजरातच्या जनतेला 22 वर्षांच्या तरुणाची सेक्स सीडी नव्हे, तर 22 वर्षांत गुजरातमध्ये काय विकास झाला याची सीडी पाहायची आहे, असे म्हणत पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने भाजपवर पलटवार केला आहे. भाजप माझी सेक्स सीडी प्रसिद्ध करणार आहे, असे वक्तव्य हार्दिकने केल्यानंतर काही दिवसातच त्याचा कथित सेक्स व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर भाजपने त्याला लक्ष्य केले होते. पाटीदार समाजाची ताकद काँग्रेसच्या बाजूने उभी करणारा पाटीदार नेता हार्दिक हा सध्या गुजरात निवडणुकीत भाजपची डोकदुखी ठरला आहे.

माझ्या बदनामीसाठी कोट्यवधी रूपये खर्च
हार्दिकने भरूच जिल्ह्यात आरक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर जनतेशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, चला, असे मानू या की मी चुकलो आहे. तुम्हाला संधी मिळाली तर मला मारा, मात्र हा मुद्दा आपल्या समाजाच्या अधिकारांचा आहे. मुद्दा शेतकरी आणि युवकांच्या भविष्याचा आहे. या मुद्द्यांवर भाजप सरकार काहीच का बोलत नाही? ज्याला जे करायचे ते करा, मी मागे हटणार नाही. आणखी त्वेषाने लढणारा मी आहे. 23 वर्षांचा हार्दिक आता मोठा होत आहे. मला बदनाम करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत, असा आरोप हार्दिकने केला.

हार्दिकच्या मदतीसाठी जिग्नेश मेवानी
हार्दिक पटेल यांचा कथित सेक्स व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कुणीही त्याच्या समर्थनात उघड प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता गुजरातमधील दलित समाजाचा नेता जिग्नेश मेवानी पुढे आला असून, सेक्स हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे कोणालाही तुमच्या व्यक्तिगत बाबींचे उल्लंघन करण्याचा अधिकार नाही, असे ट्विट त्याने केले आहे.