नवी दिल्ली- गावापासून शहरापर्यंत पायाभूत विकासावर आमचे सरकार भर देत आहे. देशात सध्या विकासाचे वारे वाहत असून या विकासाच्या महामार्गावर कोणालाच मागे राहायचे नाही. विकासाच्या मार्गात वाहतुकीत वेळ घालवायचा नसल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो ३ मार्गिकेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते.
आज मोदींच्या हस्ते मुंबईत मेट्रोच्या मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर ते पुण्यात होते. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, महात्मा ज्योतिबा फुले आणि महर्षी कर्वे यांची भूमी आणि बाळासाहेब ठाकरे, लोकमान्य टिळक यांची जन्मभूमी असलेल्या पुण्याला मी वंदन करतो. मला पुणे आणि महाराष्ट्राच्या जनतेने प्रेम दिले. मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इथे जमलात. याबद्दल मी तुमचा आभारी आहे, असे ते म्हणाले.