‘विकासापासून वंचित लोकांना मूलभूत सुविधा देणार’

0

हडपसर: पुणे शहर परिसरातील विकासापासून वंचित असलेल्या परिसरातील सर्वधर्मीय नागरिकांना मुलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न पुढील वाटचालीत करणार असल्याचे उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले.

ससाणेनगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहराच्या महिला आघाडी अध्यक्षा शशीताई वाघमारे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी उपमहापौरपदावर निवड झाल्याबद्दल शहर महिला आघाडीच्या वतीने डॉ.धेंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महेंद्र कांबळे, महेश शिंदे, निलेश आल्हाट, राकेश वाघमारे, आयुब शेख, बाळासाहेब जानराव, आसित गांगुर्डे, संतोष खरात, नीता अडसुळ, जुबेरभाई शेख आदी उपस्थित होते.

डॉ.धेंडे म्हणाले, ‘समाजातील सर्व जातीधर्मियांना न्याय देण्याकरीता आगामी काळात कार्यकर्त्यांनी मुस्लीम, दलित, बहुजनांचे प्रश्‍न सोडवण्याकरीता काम करावे. शहरात पंचवस नगरसेवक भविष्यात निवडून आणण्याकरीता आपण सर्वांनी एकत्र येऊन कामाला लागले पाहिजे. समाजाकरिता वर्षानुवर्ष संघर्ष करणार्‍या वाघमारे यांच्या पाठीशी सर्व कार्यकर्त्यांनी पक्षवाढीकरीता उभे राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वाघमारे म्हणाल्या ‘कष्टकरी समाजातील महिलांपुढील समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यांच्यापर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजना पोहोचत नाहीत. व्यसने, गुन्हेगारी, मुलभूत नागरी सुविधा तळागाळात पुरेशा प्रमाणात न पोहोचणे याचा सर्वांत जास्त त्रास महिलांना होतो. या समस्यांवर काम करण्यावर भविष्यात आपण सर्वांनी भर दिला पाहिजे. मेळावा आयोजित करण्यासाठी राकेश वाघमारे, बंडु सोनवणे, वैशाली शिंदे, विकास भोसले व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.