नारायणगाव । नारायणगावचा केंद्र सरकारच्या रुरल अर्बन योजनेत समावेश करुन 30 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन गावात विकासगंगा आणली जाईल. याआधी लोणी काळभोरला 22 कोटी व वडगाव माळवला 26 कोटी या योजनेंतर्गत उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच नारायणगावात हा निधी लवकरच आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे नारायणगावच्या अंतर्गत महामार्गावर होणारी ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी राजगुरुनगर आणि नारायणगावसाठी 39 कोटी रुपये मंजुर झाले आहेत. त्यापैकी 26 कोटी नारायणगावच्या अंतर्गत महामार्गासाठी आहेत. त्याची टेंडरप्रक्रिया लवकर सुरु होऊन कामाला सुरुवात होणार आहे. तसेच यापुढील काळातही राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या मार्फत नारायणगावच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी दिले.
जनतेचा विश्वास विसणार नाही
नारायणगाव ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या विजयी सत्कार सभारंभ व आभारसभेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. गावातून वाजत-गाजत विजयी मिरवणूक काढून आनंद साजरा करण्यात आला. त्यानंतर आभारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई बुचके म्हणाल्या की नारायणगावला पुन्हा अन्याय अत्याचाराला सामोरं जावं लागणार नाही. तसेच विरोधकांनी स्वत:चं आत्मपरिक्षण करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तसेच नवनिर्वाचित सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, जनतेने टाकलेला विश्वास आयुष्यभर विसणार नाही. आणि जनतेच्या समस्या या त्यांच्या सोबत राहुन मध्यस्तांशिवाय सोडवल्या जातील त्यात राजकारण केले जाणार नाही असे सांगत जनतेचे आभार मानले.
मान्यवरांची मोठी उपस्थिती
या कार्यक्रमात माजी पंचायत समिती सदस्य नामदेव उर्फ बाळासाहेब पाटे यांनीही जनतेचे आभार मानत सरपंचाचा बाप होण्याचा अभिमान याठिकाणी व्यक्त केला. यावेळी माऊली खंडागळे, प्रचारप्रमुख विघ्नहरचे संचालक संतोषनाना खैरे, सदस्य सारिका डेरे यांचीही भाषणे झाली. यावेळी नारायणगावच्या तसेच परिसरातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयहिंद ग्रुपचे तात्यासाहेब गुंजाळ, नगराध्यक्ष शाम पांडे, सभापती दिलीप डुंबरे, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, पं. स. सदस्य नामदेव पाटे, माऊली खंडागळे, जि. प. सदस्य मंगेश अण्णा काकडे, पं. स. सदस्या अर्चना माळवदकर, संगिता वाघ, राजाभाऊ गुंजाळ, उंब्रजच्या सरपंच सपना दांगट, सावरगावच्या सरपंच विमल वारे, खोडदचे उपसरपंच दिपक बाळसराफ, साळवाडीचे सरपंच माऊली शेटे, शरद अण्णा चौधरी, विकास नाना तोडकरी, रशिद इनामदार, अशोक पाटे, गणेश कवडे, अरविंद करंजखेले, प्रकाश वाडेकर, उद्योजक लहुशेठ नरवडे, ईश्वर पाटे आदिंसह परिसरातील अनेक मान्यवर, नागरिक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.