विकास कामे करण्यात सरपंच सक्षम असल्यास गावाचा विकास उत्तम होतो

0

पाळधी । सरपंच हा गाव विकासाचा मुख्य घटक असून ज्या गावचा सरपंच सक्षम त्या गावाचा विकास उत्तम होतो, असे प्रतिपादन राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी बुद्रूक येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी केले.पाळधी बुद्रूक येथे विकास कामांचे लोकार्पण सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व के. पी. नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन करुन करण्यात आले. कार्यक्रमास जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, माजी सरपंच संजू देशमुख, प्रकाश पाटील, विजू बापू पाटील, भगवान धनगर, प. सं. उपसभापती प्रेमराज पाटील, प. सं. सदस्य मुकुंद नन्नवरे, डॉ. शिवराय पाटील, माजी सरपंच भिला आप्पा रोकडे, नामदेव धनगर, युवराज बापू धनगर, वनदेव धनगर उपस्थित होते.

सरपंचाचा पाठपुरावा
यावेळी सरपंच व इतरांचा गौरव करताना ना. गुलाबराव म्हणाले, कमी कालावधीत सर्व सामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न मार्गी लावल्यामुळे अरुण पाटील व सर्व जण कौतुकास पात्र आहेत. पाळधी बुद्रूक येथे ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अरुण पाटील यांनी सतत केलेल्या पाठपुराव्याने विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत.

यात गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी गिरणानदी जवळ सी.आर. एस. फंडातून सुमारे 15 लाख रुपये खर्चून नविन विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे. गावांतर्गंत रस्त्यांवर 12 लाख रुपये खर्चून प्लेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. दोन नवीन शाळा खोल्यांचे बांधकाम व दोन शाळा खोल्यांची दुरुस्तीवर 9 लाख रुपये खर्च होत आहेत. भूमिगत गटाराचे बांधकाम करण्यावर 5 लाख रुपये खर्च होतील.

3 महिन्यात अनेक कामे
आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती व परिसरात हायमस्ट लॅम्प लावण्यावर अडीच लाख रुपये, शाळेच्या संरक्षण भींत बांधकामावर अडीच लाख, ग्रामपंचायत कार्यालय व परिसर सुशोभिकरणावर करणे, पुरुष शौचालय बांधणे आदी कामांवर 8 लाख रुपये खर्च होणार आहे. अशा प्रकारे सर्व विकास कामांवर सुमारे 37 लाख रुपये निधी खर्च होणार आहे. या कामांचे भूमिपूजन राज्यमंत्री गुलाबराव पाटील व सहसंपर्क प्रमुख के. पी. नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.सरपंच अरुण पाटील यांच्यासह उप सरपंच व इतर सदस्यांनी गेल्या 3 महिन्यांत अनेक विकास कामांचे नियोजन केले आहे.