विकास दुबे मारला गेला ही ‘त्या’ पोलिसांसाठी श्रद्धांजली; कुटुंबियांची भावना

0

कानपूर: आठ पोलिसांचे हत्याकांड घडवणारा गँगस्टर विकास दुबे आज सकाळी एन्काऊंटरमध्ये मारला गेला आहे. आज सकाळी विकासला कानपूरला नेले जात असताना पोलिसांच्या ताफ्यातील एका कारला अपघात झाला. विकास दुबे याच कारमध्ये होता. कार उलटताच त्याने पोलिसांकडील बंदूक घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्याभरापासून पोलिसांना विकास दुबेचा शोध सुरु होता. आता विकास दुबे मारला गेल्याने मयत पोलिसांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांनी विकास दुबेला मारून मयत पोलिसांना खरी श्रद्धांजली अर्पण केल्याची भावना मयत पोलिसांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाल सिंह यांच्या वडिलांनी विकास दुबे मारला गेल्याने माझ्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळाली असेल अशी भावना व्यक्त केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल सुलतान सिंह यांच्या पत्नीने देखील तीच भावना व्यक्त केली आहे. विकास दुबे मारला गेल्याचे वृत्त आमच्यासाठी समाधानकारक आहे असे सुलतान सिंह यांच्या पत्नी उर्मिला वर्मा म्हणतात.