विकास पगला गया!

0

मोदींच्या होमपीचवर राहुल गांधींची बॅटिंग

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून रिमोट कंट्रोलने गुजरात सरकार चालवत आहेत. तेही 5-6 उद्योगपतींसाठीच चालवले जात आहे. गरीब आणि दुर्बलांसाठी त्यांच्या मनात अजिबात जागा नाही, अशी जोरदार बॅटिंग काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदींच्या होमपीचवर अर्थात गुजरातमध्ये केली. विकास को क्या हुआ है? असा प्रश्न त्यांनी विचारला, तेव्हा लोकांनी ’गांडो थयो छे’ (वेडा झाला आहे) असे उत्तर देऊन मोदी सरकारचा निषेध केला. अलीकडेच काँग्रेसने सोशल मीडियावर ’विकास पागल हो गया’ ही मोहीम सुरू केली आहे. तसेच, गुजरातमध्ये नर्मदा नदीजवळ उभारण्यात येणार्‍या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावरुनही राहुल यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. सरदार पटेल यांचा पुतळा चीनमध्ये तयार होत असून, त्यामागे ‘मेड इन चायना’ असा शिक्कादेखील आहे. देशासाठी ही बाब लाजिरवाणी असल्याचा घणाघातही राहुल गांधींनी केला.

राहुल गांधींनी फोडला प्रचाराचा नारळ
सद्या गुजरात दौर्‍यावर असलेल्या राहुल गांधींनी पटेल समाजाचा गड मानल्या जाणार्‍या सौराष्ट्रात अनेक ठिकाणी जनतेशी संवाद साधला. खिमराना येथील एका सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधानांनी ’मेड इन इंडिया’चे आश्वासन दिले होते. पण सरदार पटेल यांचा पुतळा चीनमध्ये बनवला जात आहे. त्याच्यावरही ’मेड इन चायना’ असे लिहिले असेल. ही लज्जास्पद गोष्ट आहे, असे त्यांनी सुनावले. गुजरातचे सरकार आज दिल्लीतून चालवले जात आहे. पण काँग्रेस असे सरकार देईल, जे गुजरातमधूनच चालेल, अशी ग्वाही देत त्यांनी प्रचाराचा नारळही फोडला. भाजपने पटेलांच्या आंदोलनावर लाठ्या चालवल्या, गोळीबारही केला. पण काँग्रेस सगळ्यांना सोबत घेऊन चालेल, असेही त्यांनी सांगितले. सरदार पटेल यांचे स्मारक आधीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. पर्यावरणप्रेमींनी या पुतळ्यावर आक्षेप घेतला होता. हा पुतळा पर्यावरणीय दृष्टिकोनातून संवेदनशील असलेल्या क्षेत्रामध्ये असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास विकासकामे पुन्हा सुरू केली जातील, शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली जाईल आणि सगळ्यांना हक्काचे घरही देऊ, अशी आश्वासने राहुल यांनी दिली.

गुजरातमध्ये नवीन राजकीय समीकरणे
गुजरात दौरा सुरू करताना, राहुल गांधींनी नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून मोदींवर शरसंधान केले होते. कुणाचाही सल्ला न घेता, मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर आक्रमण केल्याची टीका त्यांनी केली होती. पाटीदार पटेल समाजाचा नेता हार्दिक पटेलने काल राहुल गांधी यांचे स्वागत केले होते. तेव्हापासूनच, गुजरातमध्ये वेगळी राजकीय समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.