विकृतांच्या दुनियेत स्त्री-सक्षमीकरणाच्या बाता!

0

मी झोपडपट्टीत, बंगल्यात, जंगलात, रस्त्यावर,
लॉजवर, घरात घुसून कुठेही बलात्कार करतो.
मी चालत्या बसमध्ये बलात्कार करतो.
मी निरागस चिमुरड्यांवर बलात्कार करतो, मारून टाकतो.
मी 70 वर्षांचा असून 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो.
मी 21 वर्षाचा सळसळत्या रक्ताचा तरणाबांड तरुण,
70 वर्षाच्या आजीवरही बलात्कार करतो.
मी मामा असूनही 2 महिन्याच्या भाचीवर बलात्कार करतो.
मी अपंग, निराधार, विधवा कुणावरही बलात्कार करतो.
मी कधी-कधी जमलंच तर निरागस मुलांवरही बलात्कार करतो.
मी इतका भयानक आहे, तरीही लोक मला माणूस म्हणतात…!

दोनेक वर्षापूर्वी लिहिलेल्या या ओळी काल पुन्हा आठवल्या. खानदेशात या दोन दिवसात दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या. एका मुलीचे वय 4 तर दुसरीचे 7 वर्ष. मागे एका घटनेत अवघ्या 28 दिवसाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. अशा घटना ऐकल्यानंतर माणूस नावाच्या सिस्टमवरील विश्‍वासच कमी व्हायला लागलाय. खरंतर अशा विषयावर लिहायला किंवा बोलायलासुद्धा प्रथमता आपल्याला पुरुष असण्याची प्रचंड लाज वाटायला हवी. बलात्कार शब्द कुठे ऐकला आणि वाचला की मन धस्स झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक संवेदनशील माणूस येथे विव्हळणार. अशा घटना घडल्यानंतर आपण करतो तरी काय? आज हाती आलेल्या सोशल मीडियावर निषेधाचे दोनचार शब्द लिहिणार. जरा जास्तच वाईट वाटलं तर काहीवेळ रस्त्यावर उतरून मोर्चे आणि मेणबत्त्या पेटवणार, यापलीकडे काही नाही. खरंतर अशा अमानवीय घटना घडल्यानंतर येणार्‍या प्रतिक्रियेपेक्षा अशा घटनाच घडू नयेत, यासाठी आपल्या सभोवतालच्या समाजाची मशागत करणे आवश्यक आहे.

सर्वप्रथम आपल्याला स्त्री या घटकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा लागणार आहे. स्त्री किंवा मुलींना आपण ‘विशेष’ का बरं समजतो? हा खरंतर मोठा प्रश्‍न आहे. एका सामान्य माणसाच्या श्रेणीतच स्त्री हा घटक देखील मोडतो आणि आपण त्याकडे सामान्य म्हणूनच पाहिले पाहिजे, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या विरोधात कुठलीही गोष्ट करणे खरंतर चुकीचेच आहे. मग सेक्ससारखी सर्वाधिक आनंद देणारी गोष्ट एखाद्याच्या विरोधात का करावी आणि सेक्स हा मेंदूपासून नव्हे तर मनापासून आला तरच बेहतर असतो. मात्र, आज केवळ मुलींच्या एकटेपणाचा फायदा घेऊन, त्यांच्या कपड्यांना कारण ठरवून, मजबुरीचा फायदा घेत जबरदस्तीने बलात्कार होण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होतेय. यासाठी स्पेसिपिक असे कुठले ठिकाणही ठरलेले नसते. मध्यंतरी मुंबईत रिपोर्टिंगसाठी गेलेल्या एका पत्रकार मुलीवर बंद मिलमध्ये बलात्कार झाला. दिल्लीत निर्भयावर बसमध्ये, अनेक कार्यालयांमध्ये, चालत्या गाडीत कुठेही बलात्कार होतात. यामागे पुरुषी हैवान बनलेली पुरुषी मानसिकताच जबाबदार असते. बलात्कार हे फक्त अनोळखी, विकृत लोकांकडून होतात किंवा एकटे असताना, निर्जन ठिकाणी असताना होतात, असेही नाही. अनेक बलात्कार हे विश्‍वासातल्या, नात्यातल्या अगदी घरातल्या व्यक्तींकडून घराच्या चार भिंतीत देखील होतात. एवढंच काय मध्यंतरी शाळांमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थिनींवर बलात्कार झाल्याच्या घटनांनी देखील खळबळ उडवून दिली होती. बलात्कार का होतात आणि बलात्कार करण्यामागची पुरुषांची मानसिकता काय असते? याचा विचार करण्याची तसंच ती मानसिकता बदलण्याची गरज आहे.

आजकाल बलात्काराची घटना घडल्यानंतर विकृतांची एक वेगळीच जमात निर्माण झाली आहे. ही जमात बलात्कारी लोकांपेक्षा अधिक खतरनाक वाटते. बलात्काराची घटना समोर आल्यानंतर ही जमात पहिल्यांदा बलात्कार पीडित आणि नंतर बलात्कार करणार्‍या आरोपीची जात शोधते. जात समजल्यानंतर ‘त्या’ बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्याच्या तीव्रतेचे प्रमाण ठरवले जाते किंवा निषेध करायचा की, नाही हे ठरवणारी ही जमात. म्हणजे बलात्काराच्या घटनेला आपल्या सोईनुसार वापरणारी ही लोकं फारच खतरनाक भासतात. घटना झाल्यानंतर मुलगी कुठल्या जातीची आणि आरोपी कुठल्या जातीचे यावरून बलात्काराची तीव्रता ठरविणारा समाज निर्माण झालाय. यामुळे पहिल्यांदा अशा लोकांच्या मेंदूची मशागत होणे आवश्यक आहे किंवा अशा लोकांनी आपल्याच अंतर्मनाला प्रश्‍न विचारणे आवश्यक आहे. बलात्कार करणारा व्यक्ती तर दोषी आहेच अशा नराधमांना कडक शासन होणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्ष घटना घडून गेल्यानंतर या घटनेचे आपल्या सोईप्रमाणे राजकारण करून सामाजिक बलात्कार करणार्‍या विकृतांचे काय करायचे? हा देखील मोठा प्रश्‍न आहे. खरंतर अशा घटनांमधील पीडितेला ‘त्या’ बलात्कारापेक्षाही घटनेनंतर होणारा सामाजिक बलात्कारच व्यवस्थित जगू देत नाही. अमर हबीब म्हणतात, आपल्याकडे बळी जाणार्‍यालाच काळजी घेण्याचे सल्ले दिले जातात. मारेकर्‍याबद्दल मात्र सोईस्करपणे मौन बाळगले जाते. अशा घटना घडल्यावर पोरीच्या जातीने कसे राहावे? कसे वागावे? यावर उपदेश करणारेच लोकं जास्त आढळून येतात.

आपल्या देशामध्ये बलात्काराच्या गुन्ह्याला गंभीर शिक्षा होत नाही, हे कारण महत्त्वाच आहे. अनेक गुन्हेगार पुराव्याअभावी सुटतात. अशा केसेस हाताळताना कमकुवत पडणारी पुरुषसत्ताकतेतूनच आलेली पोलीस आणि न्यायव्यवस्था कारणीभूत आहे. आजकाल सोशल माध्यमांच्या वचकामुळे यामध्ये थोडाफार फरक पडू लागलाय. मात्र, केवळ कडक शिक्षा झाल्याने बलात्कार कमी होतील का? यासाठी मानसिकता बदलणे हाच एकमेव पर्याय आहे. गौरी सुनंदा म्हणतात की, बलात्काराची सुरुवात ही मेंदूपासून होते. त्यामुळे बदलही मेंदूपासूनच व्हायला पाहिजे. सगळ्याच गोष्टींकडे लैंगिक दृष्टीने बघणे योग्य नाही. स्त्री-पुरुषांमध्ये मनमोकळा संवाद, मैत्री, एकमेकांविषयी आदर, भाव-भावनांचा, एकमेकांच्या शरीराचा आदर करणे गरजेचे आहे. प्रत्येक पुरुषाने स्त्री उपभोगाची वस्तू ही पुरुषप्रधान मानसिकता बदलणे आवश्यक आहे. स्त्रीला स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. हा अधिकार सहजासहजी मिळणार नाही आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेत पुरुषांनी मिळणारे फायदे सोडायला ते सहजासहजी तयार होणार नाहीत.

आज खरोखर स्त्रियांनी या व्यवस्थेत गुलामगिरी स्वीकारून परावलंबी जगणे सोडले पाहिजे. स्त्रियांनी ही चाकोरी तोडून आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. बलात्काराच्या घटना खर्‍या अर्थाने थांबायच्या असतील तर समतेवर आधारित समाजनिर्मितीची गरज आहे. लैंगिक संबंधाचे जीवनातील महत्त्व, तसेच त्याच्यामध्ये अडकलेले नातेसंबंध, अन्याय, अत्याचार याचा विचार करून, त्याविषयीचे योग्य, शास्त्रीय ज्ञान, दृष्टीकोन दिला पाहिजे. प्रेम, विश्‍वास, संमती, समोरच्या व्यक्तीच्या इच्छेचा, मताचा आदर आणि स्वीकार यांसारखी मूल्य जाणीवपूर्वक बिंबवण्याची गरज आहे. खरंतर कोणत्याही महिलेवर, मुलीवर झालेला बलात्कार हा अगोदर एक स्त्री प्रश्‍न आहे. त्यामुळं निव्वळ जाती-धर्माच्या आधारावर बलात्काराच्या कोणत्याही घटनेचं मोजमाप करणं चुकीचं आहे. स्त्रीने स्वत: सक्षम होणे तर गरजेचे आहेच. मात्र, स्त्रिया आणि मुलींसाठी समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. अन्यथा, विकृतांच्या या दुनियेत स्त्री-सक्षमीकरणाच्या नुसत्या बाताच मारल्या जातील. जबाबदारीने वागलो नाहीत म्हणून पूर्वापार पासून बलात्कार होताहेत आणि भविष्यातही होत राहतील आणि आपण घटना घडल्यानंतर काही काळापुरते बोगस, दिखावू निषेधाच्या मेणबत्त्याच पेटवत राहू…
निलेश झालटे- 9822721292